Published On : Fri, Jun 5th, 2020

कंत्राटी पद्धतीने १०० अग्निशमन विमोचकांची त्वरीत नियुक्ती करा!

अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड.संजय बालपांडे

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेमध्ये नउ अग्निशमन स्थानकाकरिता अग्निशमन विमोचकांची (फायरमॅन) ३४६ पदे मंजूर असून फक्त ६१ कर्मचारी कार्यरत तर २८५ पदे रिक्त आहेत. पावसाळा सुरू होत असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक अग्निशमन स्थानकावर अतिरिक्त विमोचकांची गरज आहे. ही गरज लक्षात घेता कंत्राटी पद्धतीने १०० अग्निशमन विमोचकांची त्वरीत नियुक्ती करा, असे निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड.संजय बालपांडे यांनी दिले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विविध विषयांच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.५) अग्निशमन व विद्युत विशेष समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती ॲड.संजय बालपांडे यांच्यासह उपसभापती निशांत गांधी, सदस्य संदीप गवई, मनोजकुमार गावंडे, सदस्या भारती बुंडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी श्री.बी.पी.चंदनखेडे व सर्व स्थानाधिकारी उपस्थित होते.

अग्निशमन विभागामधील रिक्त पदांची माहिती बैठकीत उपसभापती निशांत गांधी यांनी मागितली. मनपाच्या अग्निशमन विभागामध्ये नउ स्थानकाकरिता फायरमनची एकूण ३४६ पदे मंजूर असून केवळ ६१ पदांवर कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. शहराची लोकसंख्या लक्षात घेता सेवा पुरविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता आहे. शहरातील नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी सद्यस्थितीत प्रशिक्षित अग्निशमन कर्मचा-यांची आवश्यकता असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने मान्य करण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेमध्ये कंत्राटी तत्वावर तीन आर्थिक सल्लागार नियुक्त करण्याबाबत आयुक्तांमार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि पावसाळ्यात उद्भवणारी बिकट परिस्थिती लक्षात घेता कंत्राटी तत्वावरील आर्थिक सल्लागार नियुक्तीच्या धर्तीवर कंत्राटी तत्वावर १०० अग्निशमन विमोचकांचीही नियुक्ती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी व त्वरीत नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश अग्निशमन समिती सभापती ॲड.संजय बालपांडे यांनी दिले.

यासह बैठकीत अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेगवेगळ्या पाठ्यक्रमादरम्यान लागणारा खर्च मनपा वहन करण्याबाबत धोरण निश्चित करण्यासंदर्भात व अग्निशमन सेवा शुल्क व्यतिरिक्त कार्याकरिता आकरण्यात येणा-या शुल्क वाढीबाबत चर्चा करण्यात आली.

अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाची कार्यप्रणाली फार जोखीम स्वरूपाची असून एखाद्या दुर्घटनेत धोक्यात असलेल्या व्यक्तीचा जीव वाचविताना स्वत:ची सुरक्षा ठेवून अधिकारी व कर्मचा-यांना कुशलतेने कार्य करावे लागते. ही कुशलता त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त होते. मनपाच्या आपत्ती प्रतिसाद प्रणालीचे सक्षमीकरण करण्याकरिता हे प्रशिक्षण असते. या प्रशिक्षणामुळे मनपाच्या सेवेत सुधारणा व अधिकारी, कर्मचा-यांची कार्यकुशलता वाढविण्यास मदत होते. त्यामुळे या प्रशिक्षणाचा खर्च मनपाने वहन करावा, या शिफारशीसह समितीद्वारे विषयाला मंजुरी प्रदान करण्यात आली.

याशिवाय अग्निशमन विभागातर्फे वेगवेगळे कार्य व सेवेकरिता शुल्क आकारले जाते. मनपाच्या महासभेमध्ये २००९ साली मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार सद्या शुल्क आकारणी करण्यात येते. मात्र हे धोरण १० वर्ष आधीचे असल्याने विभागाच्या खर्चात वाढ होत असून उत्पन्नातही वाढ होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अग्निशमन विभागाद्वारे राज्यातील इतरही महानगरपालिकेतर्फे आकारण्यात येत असलेल्या दराचा अभ्यास करून कोणतिही संस्था किंवा व्यक्तीवर जास्त आर्थिक भार येणार नाही, याचे ताळमेळ ठेवून शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार करावा व तो समितीकडे सादर करावा, असेही निर्देश यावेळी अग्निशमन व सुधारित विशेष समिती सभापती ॲड.संजय बालपांडे यांनी दिले.

Advertisement