नागपूर : नागपूर महापालिकेचे नवे आयुक्त राधाकृष्णन बी. उद्या गुरुवारी नागपुरात दाखल होणार आहेत. तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्याकडून फोनवरूनच ते शुक्रवारी महापालिकेचा पदभार स्वीकारतील.
राधाकृष्णन २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. जालना जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांची प्रशासकीय सेवेला सुरुवात झाली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, नाशिकचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अध्यक्ष, मुंबई म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. अतिशय मितभाषी आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. विदर्भात त्यांनी आजवर काम केले नाही. नागपूर महापालिकेच्या माध्यमातून ते प्रथमच विदर्भात येत आहेत.
महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांची ही पहिलीच नियुक्ती आहे. मध्यंतर सनदी अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यामुळे सुमारे एक महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत ते होते. तुकाराम मुंढे यांनी सात महिन्यांच्या कार्यकाळात शहरात चांगलाच दबदबा निर्माण केला होता. महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. कुठलेच घोटाळे, गैरव्यवहार खपवून घेतले नाहीत. जनतेमध्येही मुंढे अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. त्यामुळे नव्या आयुक्तांकडूनही नागपुरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
नागपूर माझ्यासाठी नवे शहर आहे. येथे काम करण्याची चांगली संधी आहे. आजच नियुक्तीचे आदेश मिळाले असून गुरुवारी मी येत आहे. मावळते आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष न भेटता त्यांच्याशी फोनवर बोलून महापालिकेचा पदभार स्वीकारू.
– राधाकृष्णन बी., पालिकेचे नवे आयुक्त.