नागपूर : आठवड्याभरापासून गुन्हे शाखेला गुंगारा देणारा शिवसेनेचा निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव अखेर पोलिसांच्या हाती लागला. त्याला बुधवारी सायंकाळी अंबाझरी येथील पांढराबोडी येथून अटक करण्यात आली. कडव याच्या अटकेमुळे अनेक प्रकरणाचा आता पर्दाफाश होणार आहे.
कडव याच्या विरुद्ध सक्करदरा, हुडकेश्वर, बजाजनगर, अंबाझरी, सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. तो जमिनीची विक्री, सरकारी काम करून देण्याचे, नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करीत होता. जमिनीवर कब्जा करून हप्ता वसुलीही करीत होता. पोलिसांनी ३० जून रोजी पहिला गुन्हा दाखल केला हे कडवला माहीत झाल्यामुळे तो फरार झाला. हुडकेश्वर प्रकरणात कडवची पत्नी रुचिका हिलासुद्धा आरोपी बनविण्यात आले. सक्करदरा येथील देवा शिर्के या बिल्डरच्या फसवणुकीत रुचिकाचाही सहभाग असल्याची माहिती आहे. आज तिची जमानतीवर सुटका झाली आहे. यानंतर तिला सक्करदरा प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे हप्ता वसुली विरोधी पथक आठवड्याभरापासून कडवचा शोध घेत होते. पोलिसांना कडव शहराच्या सीमेलगत असलेल्या वस्त्यांमध्ये लपून असल्याची माहिती मिळाली होती. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापा मारला. पण तो पोलिसांना चकमा देऊन पसार होत होता.
पत्नीची पेशी असल्यामुळे होता नागपुरात
बुधवारी कडवच्या पत्नीची न्यायालयात पेशी होती. त्यामुळे तो दुपारपासूनच शहरात होता. सायंकाळी ६.३० वाजता कडव पांढराबोडीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेने लगेच पोहचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याची विचारपूस करण्यात आली.
कडवने केले रडण्याचे नाटक
पोलिसांनी कडवला ताब्यात घेऊन चौकशीचा खाक्या दाखवताच त्याने सुरुवातीला रडण्याचे नाटक केले. मात्र पोलिसांनी दबाव वाढविल्यानंतरही त्याने माहिती देण्यास नकार दिला. कडव याच्यासोबत शहरातील गुन्हेगार व काही चर्चित लोक जुळले आहेत. कडवच्या अटकेनंतर त्याच्याशी जुळलेल्या लोकांचेही प्रकरण पुढे येण्याची शक्यता असून त्यांच्यात खळबळ माजली आहे.
ऑटोतून होत होता पसार
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कडव हा पांढराबोडी परिसरातील त्याच्या मित्राच्या घरी येणार होता. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. आरोपी मंगेश हा ऑटोतून पळून जात असताना पोलिसांनी ऑटोला थांबवले आणि मंगेशच्या मुसक्या बांधल्या. ही कारवाई प्रशांत देशमुख, किशोर महंत, बट्टुलाल पांडे, सतीश मेश्राम, संजय पांडे, मंजित सिंग, सतीश ठाकूर, आशिष चवरे, अश्लेंद्र शुक्ला, मनीष पराये यांनी केली.