ना. नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास कंपनी सेके्रटरी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांशी ई संवाद
नागपूर: कोरोना विषाणूचा विपरित परिणाम भारतच नव्हे तर संपूर्ण जग भोगत आहे. अशा स्थितीत आपल्याला कोरोनाचे युध्द आणि आर्थिक युध्द दोन्ही सोबतच जिंकायचे आहेत. या काळातच सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यामुळे या दोन्ही आघाड्यांवर आपण जिंकू असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांशी गडकरी ई संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- या काळात सकारात्मकता आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कोरोनासोबत नियम पाळून जगायला शिकणे आवश्यक आहे. जोपर्यंत या विषाणूवर औषध निघत नाही तोपर्यंत समस्या निर्माण होणारच आहेत. त्याचा यशस्वी संघर्ष आपल्याला करायचा आहे. अर्थव्यवस्था ढासळली असताना एमएसएमईची अर्थव्यवस्थेत आज महत्त्वाची भूमिका आहे. निर्यातीत 48 टक्के सहभाग एमएसएमईचा असून 11 कोटी रोजगार या संस्थेने केला आहे, असेही ते म्हणाले.
अर्थव्यवस्था मजबूत करीत असतानाच ग्रामीण भागातील उद्योगही मजबूत झाले पाहिजे. यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळणार आहे. ग्रामीण उद्योगांची अर्थव्यवस्था 88 हजार कोटींची असून ती आता 5 लाख कोटीपर्यंत नेण्याचा आामचा प्रयत्न आहे. ही अर्थव्यवस्था 5 लाख कोटींची झाली तर निश्चितपणे रोजागार निर्मितीही होणार आहे. कच्चा माल ग्रामीण भागात उपलब्ध आहे. कृषी, जंगल, आदिवासी भागााचा विकास या उद्योगांमुळे होणार आहे. परिणामी निर्यातक्षम स्थिती आपली येऊन आयात कमी होणार आहे. हीच आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे. उत्पादन खर्च कमी केला तरच आपण वस्तू स्वस्त भावात देऊ शकू. या उद्योगांमध्येही परकीय भागभांडवल आणणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी एमएसएमईसाठी एका ‘चॅम्पियन’ नावाच्या पोर्टलचा शुभारंभ नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्याचे त्यांनी सांगितले. हे पोर्टल लघु उद्योगांना अधिक फायदेशीर ठरणार आहे. लघु उद्योजकांच्या समस्या एकाच ठिकाणी सुटण्यास या पोर्टलची मदत होणार आहे. वेळेवर निर्णय घेणे हेही महत्त्वाचे आहे, याकडेही गडकरींनी लक्ष
वेधले.