नागपूर : जमिनीच्या व्यवहारात एका व्यक्तीची १.५२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी एनआयटीच्या बनावट कर्मचाऱ्याला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
अनिल अजबराव ठाकरे (५५, रा. प्लॉट क्रमांक ११४, जुना सुभेदार लेआउट) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी ठाकरे याने एनआयटी कर्मचारी असल्याचे भासवून मुख्तार आलम मोहम्मद अली ( रा. २७, ओम साईनाथ नगर), नाझीम अली सय्यद अली ( रा. ४३१, आशीर्वाद नगर) या दोन आरोपींसोबत संगनमत करून जाफरीजवळील एनआयटी प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार केली. उमरेड रोडवरील हॉस्पिटल बनावट कागदपत्रे तयार करून आरोपी तिघांनी हा भूखंड गजानन आनंद देवळीकर (७०, रा. स्नेहा नगर, सेवाग्राम रोड, वर्धा) यांना १.५२ कोटी रुपयांना विकला.
सक्करदरा पीएसआय संजय सिंग यांनी देवळीकर यांच्या तक्रारीवरून तिघा आरोपींवर भादंवि कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी अनिल ठाकरे याला अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.