मुंबई-राज्यातील रेल्वे विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी तब्बल 1.73 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मुंबईसाठी 238 नव्या एसी लोकल गाड्या उपलब्ध होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
विदर्भ-मराठवाड्याला दिलासा: गोंदिया-बल्लारशहा रेल्वेमार्गास मंजुरी
या बैठकीत गोंदिया ते बल्लारशहा 240 किमी लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. 4,890 कोटी रुपयांच्या निधीचा वापर या प्रकल्पासाठी होणार आहे. या मार्गामुळे उत्तर-दक्षिण भारतातील संपर्क अधिक सुलभ होणार असून, विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले.
मुंबई लोकलसाठी महत्त्वाचे पाऊल-
मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी 238 नवीन एसी लोकल गाड्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. कल्याण ते बदलापूर या मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका तसेच कल्याण ते आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे.
132 रेल्वे स्टेशनचा होणार पुनर्विकास-
राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा आधुनिकतेकडे प्रवास सुरु होणार असून, यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी मंजूर केला आहे. रेल्वे पायाभूत सुविधा उभारणीत महाराष्ट्र आघाडीवर असून, 1.73 लाख कोटींची गुंतवणूक सध्या चालू असल्याची माहिती देण्यात आली.
सांस्कृतिक पर्यटनासाठी सर्किट ट्रेन-
राज्यातील ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि संस्कृतिक केंद्रे पर्यटकांना अनुभवता यावीत यासाठी लवकरच एक विशेष सर्किट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
फडणवीसांचा काँग्रेसवर टोला-
राज्याच्या रेल्वे विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्रासाठी फक्त 1171 कोटी रुपयांचे रेल्वे बजेट मिळायचे . मात्र, आता त्याच महाराष्ट्राला 23,778 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे बदलते चित्र केंद्र सरकारच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचे उदाहरण आहे.