नागपूर : शहरातील सक्करदरा हद्दीतील मिरे ले-आउट, भांडेप्लॉट चौक येथे ट्रेडिंग सोल्यूशन लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १०२ भांडवलदारांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी सर्व भांडवलदारांकडून एकूण १ कोटी ८४ लाख ६० हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली आहे.
माहितीनुसार, ट्रेडिंग सोल्यूशन लिमिटेडचे आरोपी चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, लोहीतसिंग धरमासिंग सुभेदार (रा. किर्लोसकर वाडी रोड, बलूस, जि. कोल्हापूर), सीईओ विजय ज्योतिराम पाटील (रा. खुपीरे, ता. करबी, जि. कोल्हापूर) आणि जेनेरूल्यू व्हिचर एलएलपीचे संबंधित अधिकारी यांनी एकमत करून नागपूरच्या सक्करदरा हद्दीतील मिरे ले-आउट, भांडेप्लॉट चौक येथे ट्रेडिंग सोल्यूशन लिमिटेडचे कार्यालयाची स्थापना केली.
या अधिकाऱ्यांनी आपल्या १०२ भांडवलदार ग्राहकांना जास्त व्याजदर, चारचाकी वाहन व विदेशी दौरा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम घेतली.
आरोपींनी या सर्व भांडवलदारांकडून एकूण १ कोटी ८४ लाख ६० हजार रुपये घेतले.मात्र त्यांना कोणताही नफा किंवा मूळ रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता तक्रारकर्त्यांनी सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.