नागपूर: चपराळा अभयारण्यातील रेडिओ कॉलर लावलेल्या वाघिणीचा मारोडा-जामगिरी जंगलात मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. प्राथमिक अंदाजानुसार विद्युत प्रवाहामुळे हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीही रेडिओ कॉलर लावलेल्या वाघ आणि वाघिणीचा मृत्यू झाला होता. चपराळा अभयारण्यात हा प्रकार पुन्हा घडल्याने वन्यजीव रक्षकांमध्ये खळबळ उडाली.
याप्रकरणी वन विभागाकडून चौकशी करण्यास सुरूवात झाली असून, यामागचे कारण जाणून घेतले जात आहे. गेल्या काही महिन्यांत विद्युत प्रवाहामुळे तीन वाघ आणि दोन सांबर मृत्युमुखी पडले. नागपूर जिल्ह्यातील खापा वनक्षेत्रात जानेवारी २०१७ मध्ये वाघीण आणि दोन सांबर, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिडमध्ये रेडिओ कॉलर केलेला श्रीनिवास हा वाघ आणि त्यानंतर कॉलर केलेली ‘टी-२७’ ही वाघीण विद्युत प्रवाहाचा बळी ठरली होती. आता आणखी एक कॉलर लावलेल्या वाघिणीचाही मृत्यू झाला आहे.