Published On : Wed, Mar 30th, 2022
By Nagpur Today Nagpur News

१०३ टक्के नागरिकांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीची पहिला डोस

Advertisement

१२ वर्षावरील मुलांमधेही उत्तम प्रतिसाद

नागपूर : कोरोनाच्या संसर्गामध्ये लसीकरण प्रभावी उपाय ठरत आहे. सध्या संसर्ग कमी झाला तरी सर्व पात्र नागरिकांनी लसीचे दोन्ही डोज घेणे गरजेचे आहे. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाकडून नागपूर शहरातील जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात लस पुरवठा करण्यात येत आहे. नागपूर शहरातील नागरिकांकडूनही लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १०३ टक्के पात्र व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. एकूणच शहरातील सर्व पात्र व्यक्तींनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेतर्फे लसीकरणासाठी प्रभावीपणे अभियान राबविण्यात येत आहे. मनपाच्या या अभियानाला शहरातील नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असून आता पर्यंत नागपूर शहरात लसीकरणाच्या दोन्ही डोस मिळून ३८ लाखांचा टप्पा पार झाला आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिक, १५ व १२ वर्षावरील मुले आणि बुस्टर डोज अशा स्वरूपात लसीकरण सुरू आहे. शहरात पहिल्या डोसचे लसीकरण निर्धारित उद्दिष्ट पेक्षा जास्त झाले असून आतापर्यंत २१ लाख ४१ हजार ६७२ एवढे लसीकरण झाले आहे. आता पर्यंत १०३ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

१५ ते १८ वर्ष वयोगटातील युवांचे १,३०,८४२ पैकी ८४,५७३ एवढे तर १२ ते १४ वर्ष वयोगातील मुलांचे ८४६३१ पैकी ७६३८ एवढे लसीकरण झालेले आहेत. १८ वर्षावरील वयोगटातील ८२.६८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे तसेच १५ ते १७ वयोगातील ४६.५१ टक्के युवांनी दुसरा डोज घेतला आहे.

नागपूर शहरातील पात्र सर्व व्यक्तींचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि लसीकरण हे अत्यंत प्रभावी आहे. नागपूर शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने आपले लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपले लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे तसेच ज्यांचे दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झालेत असे आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर आणि ६० वर्षावरील नागरिकांनी ‘बुस्टर’ डोस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

मनपाच्या आरोग्य विभागानुसार १६ जानेवारी २०२१ पासून नागपुरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली. पहिल्या टप्पयात आरोग्य सेवक, डॉक्टर, शासकीय कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, आजाराने ग्रस्त नागरिकांना लस देण्यात आली. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, दिव्यांग, भिक्षेकरू आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड देखील नाही अशा नागरिकांचे सुद्धा मनपातर्फे लसीकरण करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागानुसार ‘हर घर दस्तक’ मोहिम सुरु करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत लस न घेतलेल्या पात्र नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरणाकरीता प्रवृत्त करून शहरातील १०० टक्के पात्र नागरिकांना डोस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले.

Advertisement
Advertisement