नागपूर/उमरेड: जिल्ह्यातील उमरेड येथे गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत फटाक्यामुळे 11 महिला भाजल्याने जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
शिवस्नेह मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना मिरवणूक मार्गावरील एका निर्माणाधीन इमारतीवर फटाक्यांची आतषबाजी सुरु होती.
मात्र,त्यापैकी काही फटाके आग लावल्यानंतर वर न जाता खालच्या दिशेने आले. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पडले.त्यामुळे 11 महिला भाजून जखमी झाल्या.
या जखमी महिलांपैकी सात महिलांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चार महिलांना उमरेड मधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
‘अशी’ घडली घटना –
गणपती विसर्जनाच्या दिवशी शिवस्नेह गणेश मंडळाची मिरवणूक इतवारी रोडवरील श्रीकृष्ण मंदिराजवळून चालली होती. याठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी या इमारतीवर व्यवस्था करण्यात आली होती.
त्यानुसार मिरवणूक या परिसरात आल्यानंतर या इमारतीवरुन फटाके जवळविण्यात आले. मात्र, हवेत जाऊन फुटणारे हे फटाके खालच्या दिशेने वाळल्याने खाली फुटण्यास सुरुवात झाली. ढोल पथकातील तरुण-तरुणींच्या अंगावरही काही फटाके येऊन फुटले. तर रस्त्याच्या कडेला मिरवणूक बघण्यासाठी उभ्या असलेल्या महिलांवरही हे फटाके फुटले. यात 11 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.