नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. यापार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी मोठे विधान केले. एकनाथ शिंदेंसह गेलेले १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याचे विधान त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात दंड थोपटत शिवसेनेत फूट पाडली. अशात आता असीम सरोदेंनी १२ आमदार शिवसेनेतून उद्धव ठाकरेंकडे परत येतील असा दावा त्यांची नावे वाचत केला आहे.
एका सभेत बोलत असताना असीम सरोदे यांनी यादीच वाचून दाखवली. श्रीनिवास वनगा, लता सोनवणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैसवाल, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर हे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार आहेत असा दावा असीम सरोदेंनी केला आहे.हे बारा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात परतण्यास तयार आहेत.
कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की यांच्यासह (एकनाथ शिंदे) आपलं भविष्य नाही ज्यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही असा टोलाही असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचेही अनेक नेते शरद पवारांकडे परत येतील,असा दावाही त्यांनी केला.