Published On : Sun, Sep 23rd, 2018

गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात १२ जणांचा बुडून मृत्यू

गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात विविध भागातील नद्यांमध्ये उतरलेल्या १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भंडारा, सोलापूर, शिर्डी, अमरावती, सातारा, बुलडाणा, जालना आणि पुणे या भागातील गणेश भक्तांचा समावेश आहे. तर इतर दोन जण जखमी झाले आहेत.

पुणे ग्रामीणमध्ये घडलेल्या दोन घटनांमध्ये इंद्रायणी नदीत बुडून एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला. संदीप साळुंखे असे या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. देहूगाव येथे दुपारी ही घटना घडली. विसर्जन करताना तो नदीत पडला. उपस्थितांना शोधण्यात अपयश आल्यानंतर एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. त्यानंतर तब्बल तीन तासांनी त्याचा शोध लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून कळते. कावळ पिंपरी येथे सायंकाळी ही घटना घडली. मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात प्रवरा नदीच्या पात्रात गणेश विसर्जनासाठी उतरलेले दोन तरुण वाहून गेले आहेत. यांपैकी एकाला वाचवण्यात आले आहे तर नीरव जाधव याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. अमरावतीच्या वरुड तालुक्यात एका खदानीत गणेश विसर्जनासाठी उतलेल्या राहुल नेरकर नामक तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

साताऱ्यातील माहुली गावाजवळील कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सोलापूरातही एकाचा विसर्जनादरम्यान मृत्यू झाला आहे. बुलडाण्यातील शेलगावात धरणात गणेश विसर्जनासाठी उतरलेल्या महादेव ताकतोडे आणि पुरुषोत्तम सोळाके या दोघांचा बुडून मृत्यू झाला असून इतर दोन जण जखमी झाले आहेत.

जालन्यात गणेश विसर्जानावेळी ३ तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. येथील मोती तलावात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हे मृत्यू झाले आहेत. निहाल चौधरी, शेखर भदनेकर, अमोल रणमुळे अशी या मृत मुलांची नावे आहेत. तर भंडारा येथील पवनी तालुक्यातील सिंगोरी येथील तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. वैभव आडे आणि संकेत कनाके अशी त्यांची नावे आहेत.

Advertisement