वर्धा : हावडा मुंबई मेल एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सायंकाळी घडली असून, या आगीत सहाय्यक रेल्वे चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग धामणगाव रेल्वे स्थानकावर येत असताना हावडा एक्सप्रेसच्या इंजिनला लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, हावडा स्टेशनवरून निघालेली १२८१० क्रमांकाची हावडा मुंबई एक्सप्रेस धामणगाव स्टेशनवर येत असताना तिच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या हिंगणघाट-कासारखेड परिसरात असताना ह्या रेल्वेगाडीच्या इंजिनला आग लागली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण होते. मात्र स्थानिक गावकरी मदतीला धावून आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. हावडा एक्सप्रेसचा मुख्य चालकाने आग लागल्याचे लक्षात येताच एयर ब्रेक लावला आणि रेल्वेगाडीच्या बाहेर उडी मारली. मात्र या आगीत सहाय्यक रेल्वे चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेने पुलगाव येथे आणण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर काहीकाळ अप मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र सध्या हावडा एक्सप्रेस तब्बल १ तास २० मिनीट उशीरा धावत आहे.