नागपूर : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची अरुणिमा राजेश पौनीकर हिने ९५.५० टक्के मिळवत विज्ञान शाखेतून अव्वल ठरली आहे. अरुणिमा अर्चना आणि राजेश यांची कन्या असून तिने ६०० पैकी ५७३ गुण मिळविले आहे.
वाणिज्य शाखेतून वेदांत संदीप काकाणी आणि आर्या अभिजित राठोड ९७.६७% गुणांसह अव्वल ठरले. हे दोन्ही विद्यार्थी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचेच आहेत. अर्चना आणि संदीप काकाणी यांचा मुलगा वेदांत आणि अभिजित आणि अश्विनी यांची मुलगी आर्या यांनी बारावीच्या परीक्षेत ६०० पैकी ५८६ गुण मिळवले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. निकालापूर्वी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी त्रकार परिषद घेत निकालाची माहिती दिली. नागपूर विभागाची टक्केवारी ९०.३५ टक्के इतकी असून यंदा बारावीच्या निकालाची टक्केवारी घटल्याचे चित्र आहे. नागपूर विभागात एकूण १,५२,१२१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. एकूण १,३७,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यापैकी ६७,४४९ मुले तर ७०,००६ मुली उत्तीर्ण झाल्या. नागपूर विभागातील उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९०.३५ टक्के इतकी आहे.