नागपूर : ईडा पीडा घेऊन जा गे मारबत! दरवर्षी नागपुरात बडग्या-मारबत महोत्सव साजरा केला जातो. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. पिवळी मारबत उत्सव 14० वर्षांपासून तर काळी मारबतला 144 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला, त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षादेखील जुना असलेला हा उत्सव पोळ्याच्या पाडव्याला अविरत साजरा केला जातो.
ऐतिहासिक वारसा लाभलेली परंपरा –
नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात झाली आहे. काळी आणि पिवळी मारबत सध्या विराजमान झाली. त्यांचे दर्शन घेण्यासाठी नागपूरचं नव्हे तर राज्यातील इतरही भागातून भाविक येऊ लागले आहेत. पोळा सणाच्या चार दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबतची स्थापना केली जाते. सध्या या दोन्ही मारबत स्थानापन्न झाल्यात. त्यांना पूजण्यासाठी नागरिक आता गर्दी करू लागले आहेत. पिवळी मारबतीला देवीचे रूप म्हणून पुजले जाते. काळी मारबत ही दुर्जनांचे प्रतीक असल्याची मान्यता आहे.
ईडा पीडा घेऊन जा गे मारबत-
प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या. त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्यानं त्या रूढी परंपरांचं उच्चाटन व्हावं, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातोय. मारबत उत्सव साजरा करण्यामागं एक उद्धिष्ट आहे. ते म्हणजे, वाईट रूढी परंपरा व अंधश्रद्धेचा दहन करून चांगल्या परंपरा आणि विचारांचा स्वागत करणं. यादरम्यान ईडा पीडा घेऊन जा गे मारबत म्हणून मोठमोठ्या घोषणा केल्या जातात.
पिवळी मारबतीची परंपरा –
नागपूरच्या जगनाथ बुधवारी भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव 1885 साली साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी पिवळ्या मारबतीला140 वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिचे दहन केले जाते.
काळी मारबतीची परंपरा –
भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. त्याविरोधात काळी मारबत काढली जाते, त्याचबरोबर काळी मारबतीला महाभारताचा संदर्भ देखील दिला जातो. आज काळी मारबत या परंपरेला 144 वर्ष पूर्ण झाले आहेत.