Published On : Thu, May 2nd, 2019

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील शहीद 15 पोलिस जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

पोलिस महासंचालकांमार्फत घटनेची संपूर्ण चौकशी करणार

गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटातील शिघ्र कृती दलातील 15 शहीद झालेल्या पोलिस जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या घटनेची राज्याच्या पोलिस महासंचालकांमार्फत संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. तसेच शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असे शहिदांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना सांगितले.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिस कवायत मैदानावर गडचिरोली पोलिस दलातर्फे शहीद पोलिस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलिस दलातर्फे एकवीस बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली. पोलिस दलातर्फे संपूर्ण शासकीय प्रथेनुसार सर्व शहीद पोलिस जवानांना भावपूर्ण मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत मृत पावलेल्या 15 शहीद पोलिसांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह, नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, तसेच राज्य पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजभिये, आमदार बाळा काशीवार, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, नगरसेवक प्रमोद पिपरे यांनीही शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेमध्ये एक खासगी वाहनचालक शहीद झाला आहे. शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबियांवर या घटनेचा मोठा आघात झाला आहे, या शहिदांच्या कुटुंबियांना संपूर्ण मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची बैठक घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या पोलिस शिपायांच्या कुटुंबियांना शासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येणार आहे. यामध्ये एक कोटी आठ हजार रुपये एकत्रित मदत, शहिदांच्या वारसांना त्यांच्या पुढील चरितार्थासाठी शहीद पोलिसांच्या पुढील शासकीय सेवेनुसार 58 वर्षापर्यंत पूर्ण पगार तसेच अवलंबून असलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी, शहिदांच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी पोलिस विभाग स्वीकारणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहीदांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना दिली.

या घटनेत शहीद झालेल्या पोलिसांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्याची संपूर्ण व्यवस्था गडचिरोली पोलिस दलातर्फे करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील शहिदाचे पार्थिव विमानाने पुण्यापर्यंत व तेथून त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. प्रशासनातर्फे आवश्यक सर्व मदतीची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

1 मे रोजी कुरखेड्यापासून 6 किलोमीटरवर जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 15 जवान शहीद झाले. शहीद झालेले सर्व जवान पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.

शहीद जवानांची नावे :
· साहुदास मडावी (रा. चिखली, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली)
· प्रमोद भोयर (रा. देसाईगंज, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली)
· किशोर बोबाटे (रा. चिरमुरा, ता. अरमोडी, जि. गडचिरोली)
· योगजी हलामी (रा. मोहगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली)
· पुरणशाह दुग्गा (रा. भाकरोंडी, ता. आरमोडी, जि. गडचिरोली)
· लक्ष्मण कोडपे (रा. यंगलखेडा, ता. कुलखेडा, जि. गडचिरोली)
· दयानंद सहारे (रा. दीघोरी मोठी, ता. लखनदूर, जि. भंडारा)
· भुपेश वालोदे (रा. लखानी, ता. लखानी, जि. भंडारा)
· नितीन घोडमारे (रा. कुंभाली, ता. साकोली, जि. भंडारा)
· सर्जेराव खरडे (रा. आळंद, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा)
· राजू गायकवाड (रा. मेहकर, ता. मेहकर, जि. बुलडाणा)
· अमृत भदाडे (रा. चिंचघाट, ता. कुही, जि. नागपूर)
· अग्रमन रहाटे (रा. तरोडा, ता. अर्णी, जि. यवतमाळ)
· आरिफ शेख (रा. पाटोदा, ता. पाटोदा, जि. बीड)
· संतोष चव्हाण (रा. ब्राह्मणवाडा, ता. औंढा, जि. हिंगोली

Advertisement