नागपूर : नवरात्रात मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे. यंदा शहरात विविध ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत 150 गरबा इव्हेंट्सची नोंदणी झाली या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
नागपूर टुडेशी बोलताना नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, शहरातील गरबा कार्यक्रमांसाठी स्थानिक पोलिस ठाण्यांना परवानगी देण्याचे अधिकार दिलेले असताना यादरम्यानच्या कायदा व्यस्थेवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
आतापर्यंत सुमारे 150 गरबा इव्हेंटची नोंदणी झाली आहे. नवरात्रौत्सवाला दोन दिवस बाकी असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गरबा इव्हेंट्सच्या आयोजकांकडून रसिकांना आकर्षित करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गरबा खेळण्याचे आमिषे दाखवली आहेत. मात्र नागपूर टूडेने याबाबत अगोदर खुलासा करत पोलिस आयुक्त (सीपी) अमितेश कुमार यांनी विशिष्ट वेळेलाच परवानगी दिल्याची माहिती दिली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपूर टुडेशी बोलताना स्पष्ट केले की, नवरात्र उत्सवाच्या पहिल्या सात दिवसांसाठी नागपूर शहरात गरबा कार्यक्रमांना रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तथापि, अष्टमी आणि नवमीसाठी ही मर्यादा रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली.
नागपूर पोलिसांनी सूचित केलेल्या वेळेची मर्यादा न पाळल्यास तसेच बेकायदेशीर वेळेचे आश्वासन दिल्यास आयोजकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या आदेशानंतर वेळापत्रकाची फेररचना केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
– शुभम नागदेवे