नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब नागपूर ईशान्य यांचा संयुक्त उपक्रम ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’चा मनपाच्या १८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला. बुधवारी (ता.३) मनपाच्या जी.एम. बनातवाला शाळेतील विद्यार्थ्यांची ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’ अंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपाच्या सुमारे १८०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नयेत, त्यांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी व त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जावी या हेतूने मनपाद्वारे महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आलेला आहे. या उपक्रमाला इंडियन डेंटल असोसिएशन, नागपूर, न्यू इरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल, अरिहंत हॉस्पिटल, माधव नेत्रालय, होप हॉस्पिटल, यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे सहकार्य मिळत आहे. नागपूर शहरातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’ उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली आहे.
जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’ हा उपक्रम नागपूरच्या तरुणांसाठी निरोगी भविष्य घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यचे अध्यक्ष श्री. शरद टावरी व रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यच्या सदस्या कविता टावरी यांनी व्यक्त केला.