ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून धनादेश सुपुर्द, मे महिन्यापासून आतापर्यत 18 कोटी निधीची उपलब्धता
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील विविध उपाययोजनांसाठी ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीकडून दोन कोटींचा सामाजिक दायित्व निधी ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला.
जिल्हाधिकारी विमला आर. यांच्याकडे आज सकाळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हा धनादेश दिला. यावेळी महापारेषणचे नागपूर झोनचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, नागपूर स्थापत्याचे अधीक्षक अभियंता अविनाश कजबेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक अभय रोही, कार्यकारी अभियंता स्थापत्य प्रवीण दामके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विलास रंगारी, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.
माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कोरोना संदर्भातील वैद्यकीय उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सामाजिक दायित्व निधीसाठी मागणी करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विविध संस्था व औद्योगिक कंपन्यांना पत्र दिली होती. या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देशही आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भातील उपाययोजना करतांना ग्रामीण व शहरी भागात समपातळीवर पायाभूत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्ह्यामध्ये गेल्या मे महिन्यापासून आत्तापर्यंत 18 कोटी रुपये सामाजिक दायित्व निधीमध्ये मिळाले आहेत. यातून कोरोना संदर्भातील पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. कोरोना प्रतिबंध, तपासणी, उपचार यासाठी तात्काळ प्रतिसाद मिळणारी यंत्रणा जिल्ह्यात उभारण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.