नागपूर : गेल्या आठवड्याभरापासून एक आकडी असलेली मृतांची संख्या शुक्रवारी २० वर पोहचली. पॉझिटिव्हचीही संख्या गेल्या तीन दिवसांपासून ३०० चा आकडा पार करीत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, कोरोनाची लाट परतण्याचे दिलेले संकेत खरे ठरतेय अशी भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वीच्या शाळा सुरू होत आहेत. अशात कोरोनाने पुन्हा विळखा घालायला सुरुवात केली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाची स्थिती आटोक्यात आली होती. पण शुक्रवारी अचानक २० मृतांची नोंद झाल्याने परत दहशत पसरली आहे. शुक्रवारी ग्रामीणमध्ये ४ शहरात ५ व जिल्ह्याबाहेरच्या ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५६ रुग्ण ग्रामीणमध्ये, २७७ शहरात व जिल्ह्याबाहेरील ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले
विशेष म्हणजे चाचण्याही वाढल्या आहेत. ग्रामीण भागात १८५३ तर शहरात ५१४४ कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. शुक्रवारी २०३ रुग्ण बरे झाले. यात ६८ ग्रामीण व १३५ शहरातील आहे. आतापर्यंत १०८००० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, १००८०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ३६२९ रुग्ण अॅक्टीव्ह आहे. बरे होण्याचे प्रमाण ९३.३३ टक्के आहे.