नागपूर : नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने राज्य शासनाने २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या शुभ कार्याचे शुभारंभ केले.
जगातील लोकांनी या ठिकाणी भेट द्यावी यासाठी जागतिक दर्जाचाविकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने मंगळवारी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बौद्ध धम्म गुरु भन्ते सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, थायलंडच्या डॉ. अफिनिता चाईचाना, राजेंद्र गवई आणि स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मी नागपूरचा पालकमंत्री आहे आणि दीक्षाभूमीही माझ्याच मतदार संघात येते..त्यामुळे २०० कोटी दिक्षाभूमीच्या विकासाच्या कामाला दिले आहे. लंडन मध्ये एक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार केले असून जपानमध्ये देखील डॉ. आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. भारताला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माच्या तत्वाचे संविधान दिले. हे संविधान सर्वात चांगले संविधान आहे, असे फडणवीस म्हणाले.