नागपूर : – नागपूर जिल्ह्यातील 18 हजार 350 आणि वर्धा जिल्ह्यातील 3 हजार 151 अश्या नागपूर परिमंडलातील तब्बल 21 हजार 501 वीज ग्राहकांनी छापील वीजबिल संपुर्णपणे नाकारत कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे या ग्राहकांनी वीज बिलासाठी ई- मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीज बिलामागे 10 रुपयांची तर, वर्षाला 120 रुपयांची सूट देण्यात येते. गो-ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारणा-या नागपूर परिमंडलातील वीजग्राहकांनी वर्षभरात तब्बल 25 लाख 80 हजारापेक्षा अधिकची बचत केली आहे.
वीजग्राहकांना पर्यावरणाच्या संरक्षणात सहभागी करून घेत कागदपत्रांचा वापर कमी करण्यासाठी महावितरनने ‘गो-ग्रीन’ अभियानाअंतर्गत पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत, ग्राहकांना त्यांचे वीजबिल ई-मेल किंवा एसएमएसद्वारे प्राप्त करण्याचा पर्याय दिला जातो. यामुळे कागदाचा वापर कमी होतो आणि पर्यावरणावर होणारा -हास कमी होतो.
या योजनेचे प्रमुख फायदे:
पर्यावरण संरक्षण: कागदाचा वापर कमी होऊन वृक्षतोड कमी होते आणि पर्यावरणाचे संवर्धन होते.
खर्चात बचत: ग्राहकांना प्रति बिल ₹10/- ची सवलत मिळते. शिवाय ग्राहकांनी बिल मिळताच मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत देखील मिळते.
सुविधा: ग्राहकांना त्यांचे बिल ई-मेल किंवा एसएमएसद्वारे मिळते.
तंत्रज्ञानाचा वापर: या योजनेतून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होतो.
गो-ग्रीन योजनेत कसे सहभागी व्हावे?
महावितरणच्या https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp या लिंकवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करा.
महावितरणचे मोबाईल अॅप डाउनलोड करून त्यामध्ये गो-ग्रीन योजनेत नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर आपल्याला ई-मेलद्वारे एक लिंक प्राप्त होईल. त्या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी पूर्ण करा.
आपले ई-बिल स्पॅम फोल्डरमध्ये जाऊ नये यासाठी कृपया आपल्या ॲड्रेस बुकमध्ये महावितरणचा ईमेल पत्ता msedcl_ebill@mahadiscom.in जोडा.
जर तुम्हाला छापील बिल आवश्यक असेल तर तुम्ही ई-मेलद्वारे प्राप्त झालेले बिल आपल्या संगणकात जतन करून छापू शकता.
महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर तुम्हाला तुमचे मागील बिल देखील उपलब्ध होतील.
बिलाच्या रंगीत प्रिंटची ही सोय
वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीज बिल मूळ स्वरुपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट घेण्याची सोय आहे.
महावितरणचे गो-ग्रीन अभियान एक सकारात्मक पाऊल आहे. या योजनेत सहभागी होऊन आपण पर्यावरणाचे संरक्षण करण्यात हातभार लावावा, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. .