Published On : Thu, May 24th, 2018

परिवहन समितीचा २५.०३ लाख शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सुपूर्द

Parivahan Budget

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या वतीने २४४.८२ कोटी उत्पन्नाचा, २४४.५७ कोटी खर्चाचा आणि २५.०३ लाख शिलकीचा अर्थसंकल्प सभापती बंटी कुकडे यांनी स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडे सादर केला.

सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ‘ब’चे उत्पन्न २४४.७१ कोटी अपेक्षित आहे. सुरुवातीची शिल्लक ११.२८ लाख धरून एकूण अपेक्षित उत्पन्न २४४.८२ कोटी राहील. त्यातील २४४.५७ कोटी खर्च होईल, असे अपेक्षित आहे.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार चालू आर्थिक वर्षात इथेनॉल इंधनावर संचालित ५५ ग्रीन बस, तीनही डिझेल बस ऑपरेटरच्या माध्यमातून २३६ डिझेल बस, १५० मिडी बस तसेच महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी स्वतंत्र तेजस्वीन मिडी बसेस संचालित करण्याचा नागपूर महानगरपालिकेचा मानस आहे. पर्यावरणपूरक धोरण राबविणे हा नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाचा मानस असून याअंतर्गत २५ बायोगॅस बसेस, ७० इलेक्ट्रिक बसेस अशा एकूण ५३६ बसेसे ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होत आहे.

वीर माता, भगिनींसाठी मोफत प्रवास
चालू आर्थिक वर्षात परिवहन समितीतर्फे अनेक नवीन आणि महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘मी जिजाऊ’ मोफत प्रवास सवलत योजनेअंतर्गत देशासाठी कर्तव्यावर तैनात असताना शहीद झालेल्या आणि मनपातील अग्निशमन व आणीबाणी विभागातील शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील शहीदांच्या वीर माता, वीर भगिनी आणि वीर कन्या यांना ‘तेजस्विनी बस तथा सर्वच शहर बस सेवेतील बस’ मध्ये मोफत बस पास उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यासाठी १५ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. बस थांब्यालगत वॉटर एटीएमची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, सौर ऊर्जेद्वारे विद्युत निर्मिती करून इलेक्ट्रिक बस चार्ज करण्यासाठी त्याचा उपयोग यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागामार्फत प्रमुख बस स्थानकावर व्हिल चेअरची उपलब्धता, बस स्थानकावर वेळापत्रक लावणे, जाहिरात कंत्राट देऊन उत्पन्न स्त्रोत वाढविणे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या थांब्यावर शेड नाही अशा ६०० थांब्यावर नावीन्यपूर्ण फलकाची निर्मिती करून थांब्यावरील बस पार्किंगची जागा राखीव करण्याकरिता नावीन्यपूर्ण रंगसंगतीचे पेंटिंग करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

डेपोसाठी नवीन जागा
सध्या डिझेल बस ऑपरेटर्सकरिता असलेल्या डेपो व्यतिरिक्त शहराच्या पूर्व भागात वाठोडा येथे मनपाच्या १०.८० एकर जागेवर डिझेल बस डेपोकरिता जागा विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ग्रीन बस ऑपरेटरकरिता वाडी नाका येथे डेपोकरिता जागा विकसित करून देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. खापरी नाका येथे इथेनॉल पंप उभारणी करण्या आली आहे.

आठ संकल्पांची पूर्ती
परिवहन समितीद्वारे प्रवाशांना कार्यक्षम सेवा पुरविणे व विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्याच्या दृष्टीने मागील वर्षी दहा संकल्प समितीने निश्चित केले होते. त्यातील आठ संकल्प पूर्णत्वास आल्याचा विश्वास सभापती बंटी कुकडे यांनी अर्थसंकल्पात केला आहे. ‘मागेल त्याला बस’ या तत्वावर ६५ नवीन मार्गावर नव्याने बस फेऱ्यांची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी योजनेअंतर्गत सवलत देण्याची अंमलबजावणीही करण्यात आली. ज्या दोन संकल्पाची पूर्ती अद्याप झाली नाही त्यामध्ये बस थांब्यालगत उपाहार गृहाची निर्मिती करणे, त्यासाठी बेरोजगार युवकांना काळजीवाहक म्हणून नेमणे आणि बस थांब्याची स्वच्छता, निगा व सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणे आणि सार्वजनिक व खासगी सहभागातून टर्मिनल विकसित करणे ह्यांचा समावेश आहे. हा विषय एकत्रितरीत्या विभागीय प्रशासनाच्या अख्यत्यारीत प्रगतीपथावर आहे.

तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी समितीतर्फे ०७१२-२२७७९०९९ हा टोल फ्री व ७५००००४६५ हा व्हॉटस्‌ क्रमांक जाहीर करण्यात आल्या होत्या. टोल फ्री क्रमांकावर १४४७६ सूचना व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १३८८८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. व्हॉटस्‌ॲपवर एकूण ७७६ सूचना व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६८६ चा निपटारा करण्यात आला.

Advertisement