मुंबई: मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील 5 आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले जाणार असल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली
आज यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रत्येकी १० लाख रु देऊन गौरविले जाईल. एव्हरेस्ट सर करणाऱ्या पाच विद्यार्ध्याना गृह विभागात नोकरी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे ही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची मान देशपातळीवर अभिमानाने उंच केल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
१६ मे रोजी या पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट वर चंद्रपूर आणि महाराष्ट्राचा ध्वज फडकवला होता या धाडसाची दखल काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात घेतली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला मिशन शौर्य च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षित केले होते. चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभाग गेले वर्षभर या मोहिमेसाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करत होते. चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात मुळात काटक असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना थंड प्रदेशातील एव्हरेस्ट च्या मोहिमेवर सिद्ध करण्यासाठी उत्तर भारतातील महत्वाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते.
सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांमधून वेगवेगळ्या चाचण्या करत १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. चंद्रपुरात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या खडतर प्रवासात शेवटी 5 विद्यार्थी यशस्वी ठरले . या यशस्वी विदयार्थ्यांमध्ये कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आले आणि मनीषा धुर्वे यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी उद्यापर्यंत मुंबईत दाखल होत असून राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल.