नागपूर : गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान एका ऑटोमधून सडलेल्या सुपारीच्या २५ पोती जप्त केल्या.मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोन एक्सचेंज चौकात ही कारवाई करण्यात आली. सतीश भरत पाल (वय ३०, रा. गरीब नवाज नगर, यशोधरा नगर आणि कमल धिंग्रा ( रा. नेताजी नगर, यशोधरा नगर ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लकडगंज पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हे शाखेचे एक पथक गस्त घालत होते.
दरम्यान, टेलिफोन एक्सचेंज चौकात एक संशयास्पद ऑटो दिसला. ऑटोमध्ये मोठ्या प्रमाणात पोत्या भरल्याचे पाहून पोलिसांनी ऑटोचालक सतीश पाल याला थांबवले. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाच्या २५ पोत्या आढळून आल्या.
जेव्हा पोत्या उघडल्या तेव्हा त्यातून कुजलेली सुपारी सापडली. एफडीएने चाचणीसाठी सुपारीचे नमुने घेतले आणि सतीशने चौकशी केली असता सांगितले की हा माल कमल धिंग्राचा आहे. अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) सांगण्यात आले की सुपारी निकृष्ट दर्जाची आहे.
ती मानवांसाठी हानिकारक असू शकते. एफडीएने पोत्यातील सुपारीचे नमुने चाचणीसाठी घेतले आहेत. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. अटक केलेल्या आरोपींसह सुपारी आणि ऑटो पोलिसांच्या ताब्यात आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.