Published On : Thu, May 18th, 2023

भिवापुरात पेट्रोल पंपच्या मालकाची भरदिवसा हत्या ; तिघांना अटक

Advertisement

नागपूर : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भिवापूरमधील उमरेड- नागभीड मार्गावरील ‘पाटील ब्रदर्स पेट्रोलिअम’नावाने असलेल्या पेट्रोलपंपाच्या मालकाची तीन बुरखाधारी तरुणांनी हत्या केल्याची घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दिलीप सोनटक्के (वय ६० रा. दिघोरी) असे मृत मालकाचे नाव आहे.

या घटनेदरम्यान हल्लेखोरांनी काऊंटरमधील एक लाख ३४ हजार रुपये लुटून नेल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी काही तासातच तिन्ही आरोपींचा शोध लावला असून त्यांना बेड्या ठोकल्या. आरोपींना हा खून करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शेख अफरोज शेख हनीफ (वय ३३, रा.मोठा ताजबाग), मोहम्मद वसीम लाल मोहम्मद (वय २९, रा.खरबी), जुबेर खान (वय २७, मोठा ताजबाग) अशी आरोपींची नाव आहेत.विशेष म्हणजे अटक आरोपी जुबेर खान हा ‘हिस्ट्रीशिटर’ असल्याची माहिती आहे.

Advertisement

माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दिलीप सोनटक्के पेट्रोलपंपवर बसले असताना, तिथे शेख अफरोज, मोहम्मद वसीम, जुबेर तिघेही बुरखा घालून आलेत. त्यांनी थेट मालक सोनटक्के यांचे कार्यालय गाठून एकापाठोपाठ त्यांच्या पोटावर चाकूने वार केले. यामुळे दिलीप सोनटक्के रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना पेट्रोल पंपवरील कर्मचारी राजेश्‍वर नान्हे त्यांना वाचवण्यासाठी गेला असता त्यांच्यावरही आरोपींनी वार केले. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यापैकी एक आरोपीने पिस्टल काढून इतर कर्मचाऱ्यांना धाक दाखवीत, कॅश काऊंटरमधे असलेले एक लाख ३४ हजार घेतले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी चारचाकीमध्ये बसून पळ काढला.

घटनेची माहिती भिवापूर पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपींचा शोध घेतला. व्हॅन उमरेडच्या दिशेने येत असल्याची सूचना उमरेड पोलिसांना दिली. पोलिसांनी नाकाबंदी करीत, आरोपींना अटक केली. दिलीप सोनटक्के यांचे विवाहबाह्य काही महिलांशी संबंध होते. त्यामुळे त्यांचा पत्नीशी वाद सुरु होता. या वादातून हा प्रकार घडला काय? यासंदर्भातही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.