मुंबई: राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायत निवडणुकीचे आज निकाल लागणार आहेत. पहिल्यांदाच थेट सरपंच निवडले जात असल्याने या नव्या पॅटर्नमध्यो लक कसे मतदान करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. रविवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सरासरी 80 टक्क्यांच्या घरात मतदान झाले आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात 16 ऑक्टोबर रोजी दुस-या टप्प्यातील सुमारे 4 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींत थेट सरपंच पदासह सदस्यपदाच्या निवडीसाठी मतदान होईल.
काका जयदत्त यांना पुतण्या संदीपने दाखवले अस्मान
बीडमधील नवगण राजुरी येथील प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार जयदत्त क्षीरसागर यांना पुतणे संदीप क्षीरसागर यांनी धोबीपछाड दिला. संदीप क्षीरसागर यांच्या गटाने सरपंचपदासोबत सदस्य संख्येतही बाजी मारुन दणदणीत विजय संपादन केला. त्यामुळे आमदार क्षीरसागरांना ‘होमग्राऊंड’वरच मोठा धक्का बसला.
नवगण राजुरी येथे आमदार जयदत्त क्षीरसागर व त्यांचे पुतणे जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर यांचे पॅनल आमने – सामने होते. सरपंचपदासाठी संदीप गटाकडून दीक्षा गणेश ससाणे तर आ. क्षीरसागर पॅनलतर्फे नामदेव सातपुते यांच्यात लढत झाली. दीक्षा ससाणे यांनी सातपुते यांना पराभवाची धुळ चारली. शिवाय सदस्यांमध्येही संदीप गटानेच मुसंडी मारली. जि.प. पाठोपाठ ग्रा.पं. निवडणुकीतही पुतणे संदीप काकांना भारी ठरले आहेत. निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. मागील अनेक वर्षांपासून आमदार क्षीरसागरांचे राजुरीत एकतर्फी वर्चस्व होते; परंतु पुतण्याच्या बंडाने समीकरणे बदलली असून पहिल्यांदाच आ. क्षीरसागर यांच्या पॅनलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
मंत्री दादा भुसेंना भाजपचा दणका
मालेगाव (नाशिक)- शिवसेना नेते व राज्यमंत्री दादा भुसे यांना गावातच दणका. दाभाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या चारूशिला निकम. शेजारील सौंदाणे ग्रामपंचायत सरपंचपदी डॉ. मिलिंद पवार…
मालेगाव तालुक्यात 10 पैकी 8 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच, तर 2 ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात. येवला तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी 5 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच, तर एका ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता.