नागपूर: तीन तास पंधरा मिनिटात तीन हजार किलो चवदार खिचडी बनविण्याचा विक्रम प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी आज केंद्रीय राजमार्ग वाहतूक आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केला. या दोन्ही मंत्रीद्वयांनी या चवदार खिचडीची चव घेतली आणि मनोहर यांचे कौतुक केले.
चिटणीस पार्कमध्ये आज पहाटे साडे पाच वाजता हा उपक्रम सुरु झाला. बघ्यांची बरीच गर्दी जमली होती. 3140 लिटर क्षमतेच्या 510 किलो वजनाच्या आणि 10 फूट व्यासाच्या मोठ्या कढईत ही खिचडी तयार करण्यात आली. कोल्हापूरचे अभियंते निलेश पै यांनी ही कढई तयार केली आहे. खिचडीसाठी 11 फूट लांबीचे व 20 फूट उंच दोन खास सराटे यासाठ़ी बनविण्यात आले होते.
खिचडी बनविण्याच्या वेळी भक्तिगीते सुनील वाघमारे व अन्य गायक सादर करीत होते. काही तरुणी गरबा नृत्यही करीत होत्या. याप्रसंगी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हेही उपस्थित होते. या खिचडीसाठ़ी 275 किलो चिनोर तांदूळ, 125 किलो मुगाची डाळ, 150 किलो चण्याची डाळ, 50 लिटर तेल, 100 किलो तूप, 35 किलो मीठ, 8 किलो लाल मिरची, 5 किलो हळद, 25 किलो गूळ, 5 किलो तिखट, 15 किलो मेथी दाणे, 15 किलो धने, 25 किलो शेंगदाणे, 30 किलो अदरक, 100 किलो गाजर, 50 किलो मटर, 50 किलो दही, 40 किलो कोथिंबिर, 3 हजार लिटर पाणी एवढे साहित्य लागले.
खास लाकडाच्या चुलीवर ही खिचडी तयार करण्यात आली. सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे तेथे आले. गडकरींनी या खिचडीचे झाकण उघडले. त्याबरोबर उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. पालकमंत्र्यांनी कोथिंबिर आणि वटाणे खिचडीत टाकले आणि गडकरी यांनी खिचडीत सराटा फिरविला. साईबाबांना खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर विष्णू यांनी गडकरी आणि बावनकुळे यांनी एका द्रोणात खिचडी दिली. या दोन्ही नेत्यांनी आणि उपस्थित आमदारांनी खिचडी खाल्ली. यावेळी गडकरी यांनी विष्णू मनोहर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाला अरविंद पाटील, सुरेंद्र पवार, केशव बावनकुळे, प्रदीप बोबडे उपस्थित होते. संपूर्ण व्यवस्था संजय भेंडे, चंदू पेंडके, अरविंद गिरी, विजय शाहाकार, निरंजय वासेकर, विजय जथे, मिलिंद देशकर, राजीव जयस्वाल यांनी केली. प्रमोद पेंडके यावेळी उपस्थित होते.