नागपूर : वर्ध्याच्या वडनेर येथील एका व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी ४.५२ कोटी रुपयांनी लुटले. हे आरोपी चोरी करून नागपुरात पोलिस बनून लाल दिव्याच्या वाहनात आले होते. अलीम शेख, ब्रिजपालसिंग ठाकूर, दिनेश वासनिक अशी आरोपींची नावे आहे. तर राजा ऊर्फ विजय मालवीय याच्यासह तीन साथीदार फरार आहेत.
वर्धा पोलिसांच्या माहितीवरून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना सिनेस्टाइल अटक केली. आरोपींनी या दरोड्याचा प्लॅन तुरुंगातच रचला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून २.३६ कोटी रुपये जप्त केले आहेत.
माहितीनुसार, वर्धा येथील पोहना, वडनेर येथे बुधवारी रात्री ही दरोड्याची घटना घडली. गुजरातचे रहिवासी कमलेश शहा हे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे कार चालक म्हणून अठेसिंग सोलंकी हा काम करतो तर नितीन जोशी कार्यालय सांभाळतात. शहा यांना त्यांच्या व्यवसायानिमित्त नागपुरात येणे- जाणे होते. सोलंकी बुधवारी संध्याकाळी अरविंद पटेल नावाच्या साथीदारासह ४.५२ कोटी रुपये घेऊन कारमधून हैदराबादला निघाला. रामटेकच्या एका साथीदाराने आरोपींना अगोदरच याची टीप दिली होती. आरोपींनी शहा यांच्या गाडीचा क्रमांकही मिळवला होता. पोलिस असल्याचे भासवून आरोपींनी दरोडा टाकला. या घटनेची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी नागपूर पोलिसांना माहिती दिली. गुन्हे शाखेसह सर्वांनी खबरदारी घेत उपायुक्त मुमक्का सुदर्शन आ मिळताचणि आणि राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली रात्रीच कारचे ‘लोकेशन’ घेऊन आरोपींना अटक करण्यात आली. अलीम, ब्रिजपाल आणि दिनेश यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.