Published On : Sat, Sep 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

इलेक्ट्रिक वाहनांसाठी नागपूर परिमंडलात 44 चार्जिंग स्टेशन्स

Advertisement

नागपूर – राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने नागपूर परिमंडलात एकूण 44 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. यात महावितरणच्या स्वतःच्या नागपुरातील 6 चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे, याशिवाय नागपूर जिल्ह्यातील 31 आणि वर्धा जिल्ह्यातील 7 खासगी चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे. या स्टेशन्सवर चार्जिंग करणाऱ्या वाहनांची संख्या मागिल वर्षभरापासून सातत्याने वाढत आहे.

नागपूर शहरातील गांधीबाग विभागात कळमना आणि मेयो येथील 33 केव्ही उपकेंद्रात, महाल विभागातील मॉडेल मिल उपकेंद्रात तर सिव्हील लाईन्स विभागातील नारा, एमआरएस आणि बिजलीनगर उपकेंद्र येथे महावितरणची स्वत:ची चार्जिंग स्टेशन्सआहेत. याशिवाय खासगी चार्जिंग स्टेशन्समध्ये भारत पेट्रोलीयमची कन्हान, रामटेक, सावनेर, बुटीबोरी आणि आरसी चर्च सिव्हील लाईन्स, बुटीबोरी नगर परिषद, हिंगणा येथील रिलायन्स बीपी मोबिलीटी, एमआयडी येथील नांगिया मोटर्स, टाटा पॉवर, आणि परिवहन विभाग कार्यालय, नागपूर महानगरपालीकेचे नारा, गड्डीगोदाम, वर्धमाननगर, कळमना, हिंदुस्तान पेट्रोलीयमचे जुना भंडारा रोड आणि मॉडेल मिल येथे याशिवाय ओलासह काही खासगी व्यवसायिकांचे चार्जींग स्टेशन्स शहराच्या इतरही भागात आहेत. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील पलोटी, लक्ष्मी हॉटेल, एसव्हीएल ए जी हाऊस, देवगण, हिंगणघाट, नागलवाडी आणि कारंजा एमआयडीसी या भागात खासगी चार्जिंग स्टेशन्स आहेत.

Today’s Rate
Wednesday 06 Nov. 2024
Gold 24 KT 79,000 /-
Gold 22 KT 73,500 /-
Silver / Kg 94,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे महावितरणकडून केली जातात. महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन उभारायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. तसेच महावितरणच्या ‘पॉवरअप ईव्ही’ या अॅप्लिकेशनचा वापर करून वाहनचालक आपल्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात तसेच वाहनाच्या चार्जिंगसाठी या मोबाईल ॲपचा वापर करू शकतात.

किफायतशीर प्रवास
विद्युत वाहनांमुळे पर्यावरण रक्षणाला मदत करण्यासोबतच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते. पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक दुचाकी वाहनाला इंधनाचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे 2 रुपये 12 पैसे येतो तर विद्युत दुचाकीला प्रति किलोमीटर 54 पैसे खर्च येतो. पेट्रोलियमवर चालणाऱ्या चार चाकी वाहनाला प्रति किलोमीटर सुमारे 7 रुपये 57 पैसे खर्च येतो तर विद्युत चारचाकीला प्रति किलोमीटर 1 रुपया 51 पैसे खर्च येतो. तीनचाकी गाडीचा प्रति किलोमीटरचा खर्चही पेट्रोलियमसाठी सुमारे 3 रुपये 2 पैसे तर विजेसाठी 59 पैसे आहे.

जिल्ह्यात 22 हजारावर इलेक्ट्रिक वाहन
नागपूर शहर व ग्रामिण प्रादेशिक परिवहन कार्यालय व पुर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मिळून जिल्ह्यात आतापर्यंत 22 हजार 545 वाहनांची नोंद झाली आहे. यात 19 हजार 90 ई-बाईक्स, 1 हजार 352 ई-कार, 1 हजार 430 ई-रिक्षा, 500 मालवाहक ई-रिक्षा, 133 ई-कॅब आणि 40 ई-बसेस असून या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाहनांच्या चार्जीगसाठी आवश्यक सुविधा महावितरणतर्फ़े उपलब्ध करुन देण्यात आलि असल्याची माहिती महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिलीआहे.

Advertisement