नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभाग व महिला व बाल कल्याण समितीद्वारे घेण्यात येणारा महिला उद्योजिका मेळावा ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.
सोमवार (ता.८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समितीच्या आढावा बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपसभापती श्रद्धा पाठक, सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, साक्षी राऊत, श्रीमती जिशान मुमताज मो.इरफान अंसारी, वैशाली नारनवरे, उपायुक्त रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाल्या, महिला उद्योजिका मेळावा वैदर्भीय स्तरावर घेण्याचा विचार करण्यात आलेला आहे. विदर्भातील महिला बचत गट यामध्ये सहभागी होतील. तसेच विदर्भातील अनेक बचत गट भेट देण्यासाठी येणार आहे. महिला उद्योजिका मेळाव्यात सामजिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्याचा समितीचा मानस आहे. या आढावा बैठकीत नागपूर महानगरपालिकेद्वारे सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य शिबिर राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत बोलताना ठाकरे म्हणाल्या, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात यावे, त्यात त्यांची सर्व वैद्यकीय माहिती असेल. ते त्यांच्याजवळ कायमस्वरूपी असेल, असे निर्देश दिले.
सॅनिटरी नॅपकीन वेण्डींग मशीन्स आणि सॅनिटरी नॅपकीन नष्ट करण्याची मशीन मनपाच्या शाळेत लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. स्लम घोषित शाळांमधील मुला-मुलींकरीता मेडिकल पॉलिसी देण्याचा निर्णय झालेला आहे. त्याबाबत शिक्षण विभागाद्वारे इओआय काढण्याचा प्रस्ताव देण्याचे निर्देश सभापती ठाकरे यांनी दिले. गरजू महिलांना पिको-फॉल वाटप करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिवणयंत्र वाटपाबाबतचे निकष ठरवून देण्यात आलेले आहे. त्यावरही यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली.