नागपूर: खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा डाक बंगला परिसरात चार अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी सराफा व्यापाऱ्याला लुटून 1 किलो सोने आणि 15 किलो चांदी घेऊन फरार झाले. ही घटना मंगळवारी रात्री 8:15 वाजता घडली. चोरी गेलेल्या सोने -चांदीची एकूण किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
दरोड्याचा थरारक प्रकार-
‘निहारिका ज्वेलर्स’चे मालक रवींद्र महादेव मुसळे हे त्यांचे भाचे मयंक यांच्यासोबत दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना हा प्रकार घडला.दागिन्यांनी भरलेली बॅग गाडीत ठेवताच चार सशस्त्र लुटेऱ्यांनी त्यांना घेरले.एका आरोपीने मयंकच्या डोक्यावर पिस्तूलच्या बटने जोरदार वार केला. तसेच दहशत पसरवण्यासाठी तीन राऊंड फायरींग करण्यात आले.आरोपींनी 1 किलो सोने आणि 15 किलो चांदी व्यापाऱ्याच्या गाडीसह लंपास केले.
पोलिसांची तातडीची कारवाई-
घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी तातडीने नाकाबंदी लावून आरोपींचा शोध सुरू केला.लुटेरे पसार झाल्यानंतर पाटन सावंगी परिसरात व्यापाऱ्याची कार लावारिस स्थितीत आढळली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंता वाढली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.