नागपूर: महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना, इमारतीं, पथदिवे, विविध प्रकल्पांचे वर्षाला सुमारे 100 कोटी रुपये येणारे विजेचे बिल पाहता महापालिका आता 42 मेगावॉट सौर वीजनिर्मिती करणार आहे. महापालिकेचा 70 टक्के वीज वापर हा सौर ऊर्जेवर होणार आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आणि या प‘कल्पाला अधिक वेग यावा म्हणून एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा आयुक्त अभिजित बांगर, महावितरणचे संचालक सतीश चव्हाण, माजी महापौर प्रवीण दटके, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मु‘य कार्यकारी अधिकारी सोनवणे व अन्य उपस्थित होते.
महापालिकेचे 11 कनेक्शन हे 1 मेगावॉटपेक्षा जास्त वीज लागणारे आहेत, तर 2000 कनेक्शन हे 1 मेगावॉटपेक्षा कमी वीज लागणारे आहेत. 1 मेगावॉटपेक्षा कमी वीज लागणारे प्रकल्प नेट मीटरिंगमध्ये घेतले जातील. पथदिवे मात्र नेत्र मीटरिंगमध्ये घेता येणार नाही. महापालिकेचे 10 जागा अशा आहेत, तेथे 15 किलोवॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प घ्यावे लागणार आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी महापालिकेने एकच मीटर घेतले तर विजेचे दर कमी पडू शकतात, यासाठ़ी महापालिका वीज नियामक आयोगाकडे अर्ज करणार आहे.
सौर ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेता सौर ऊर्जेचे दर बाजारात कमी येत आहेत. तसेच पारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी जुने सर्व संच बंद करून नवीन संच आणि तंत्रज्ञानाने वीज निर्मिती होणार असल्यामुळे भविष्यातही विजेचे दर वाढण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते.
मोबाईल टॉवर
शहरातील इमारतींवर असलेल्या मोबाईल टॉवरसंदर्भात येत असलेल्या नागरिकांच्या तक‘ारी पाहता मोबाईल टॉवर हटविण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत, तर दुसरीकडे महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय मोबाईल टॉवरला वीज कनेक्शन देणे बंद करण्यात आले आहे. ज्या इमारतींवर मोबाईल टॉवर आहेत, त्या इमारतींचा मंजूर नकाशा व ऑक्युपेन्सी प्रमाणपत्र सादर केल्यास मोबाईल टॉवरला परवानगी देता येईल. नवीन मोबाईल टॉवर उभारणी सध्या बंद असून जुन्या मोबाईल टॉवर असलेल्या इमारतींना 1 वर्षाची मुदत ऑक्युपेन्सी प्रमाणपत्र आणण्यासाठी देण्यात आली आहे.
याच बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना आणि स्मार्ट सिटीच्या काही प्रकल्पांबाबतचा आढावा घेण्यात आला. याप्रसंग नासुप्रच्या सभापती श्रीमती शीतल उगले उपस्थित होत्या. तसेच पट्टेवाटप योजनेत येणार्या काही अडचणीही प्रवीण दटके यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यावरही उच्चस्तरावर चर्चा क़रून बैठक घेण्यात येणार आहे.
नागरिकांनी पाण्याचे नियोजन करूनच वापर करावा : पालकमंत्री
पाऊस उशिराने येण्याची शक्यता लक्षात घेता आणि जलशयांमधील पाण्याचा साठा प्रचंड कमी झाला असताना शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीनंतर बोलताना केले. येत्या 30 जूनपर्यंत पुरेल एवढाच पाण्याचा साठा आहे. पाईपलाईनमधील लीकेजेस मनपा प्रशासनाने बंद करावेत. रस्त्यांचे किंवा विकासाची कामे सुरु असताना जर पाण्याची पाईप लाईन क्षतिग‘स्त झाल्यास लगेच दुरुस्त करावी. पाणी वाया जावू देऊ नये. पिण्याचे पाणी कुणालाही कमी पडणार नाही. पण नैसर्गिक पाण्याचे स्रोत उदा. विहिरी, विंधन विहिरींचे पाण्याचा उपयोग वापरण्यासाठी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.