अहमदनगर: अहमदनगर कृषी प्रधान जिल्हा असून जिल्ह्यातील दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त करण्यासाठी कुकडी धरणाच्या पाण्याचे पुनर्वाटप करण्याबातचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर निळवंडे धरणाच्या कामासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाळगाव येथे केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचे भूमीपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, विभागीय आयुक्त महेश झगडे, कुलगुरू डॉ.के.पी.विशवनाथा, जिल्हाधिकारी अभय महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून जगातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहोचविण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलेही या विद्यालयात आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन आपल्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करतील. शेतीचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी राज्य शासनाने कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली असून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील 800 गावांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक लाख हेक्टर जमीन संरक्षित सिंचनाखाली आली आहे. जिल्ह्यात 1200 शेततळे तर 5 हजार सिंचन विहिरीची कामे पूर्ण झाली आहेत. त्या माध्यमातून श्वाश्वत सिंचन निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.
राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जिल्ह्यातील दोन लाख 37 हजार शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरले आहेत. त्यापैकी एक लाख 16 हजार शेतकऱ्यांच्या खाती 800 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
जामखेड शहराच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यातील 12 लाख बेघर नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर सर्वांना देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या शेतमालाची नोंदणी करण्यात येत असून नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदी केल्याशिवाय कुठलेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा.शिंदे म्हणाले दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी 65 कोटी रुपयांचे कृषी महाविद्यालय हळगावला मंजूर केले. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे जामखेड तालुकाची दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रा.शिंदे यांनी सांगितले.
कृषी राज्यमंत्री खोत म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन हे शासन शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे दाखवून दिले आहे. हे शासन सर्वसामान्यांचे शासन असल्याचे त्यांनी नमूद केले.
राहूरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विश्वनाथा यांनी प्रास्ताविक केले. सुभाष आव्हाड यांनी आभार मानले.