माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नागपूर परिसरात घडली आहे. 19 वर्षीय तरुणीला स्प्रे मारून बेशुद्ध करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. क्रूरतेचा कळस गाठणा-या या नराधमाने पीडित तरुणीच्या गुप्तांगात स्टील रॉड टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या योगिलाल रहांगडाले (वय 52) असे या आरोपीचे नाव असून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने संपूर्ण पारडी भागात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध
करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व तिचा भाऊ पारडीतील एका संस्थेत काम करतात. याच संस्थेत रहांगडाले हा पर्यवेक्षक आहे. संस्थेलगतच असलेल्या एका खोलीत पीडित तरुणी, तिचा भाऊ, अन्य एक तरुणी व रहांगडाले राहतो. 21 जानेवारीला तरुणीचा भाऊ गावाला गेला. अन्य एक तरुणीही बाहेरगावी गेली. मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास रहांगडाले खोलीत आला. त्याने तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. ती बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध होताच रहांगडालेने तिच्या गुप्तांगात स्टीलचा रॉड टाकला. त्यानंतर पहाटे 5 वाजतापर्यंत त्याने तरुणीवर अत्याचार केला व पसार झाला.
सकाळी तरुणी शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरड करून जवळ राहत असलेल्या कर्मचा-यांना बोलावले. त्यांनी त्वरित पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिने पारडी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रहांगडाले अटक केली. पोलीस पुढील तपास करत असून आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.