नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी २०२४-२५ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प गुरूवारी (ता.२९) सादर केला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभाकक्षात पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांनी २०२४-२५ या वर्षाचा ५५२३.७३ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, डॉ. सुनील लहाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. रवींद्र भेलावे उपस्थित होते.
मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडताना मनपा प्रशासक व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अर्थसंकल्पात २०२३-२४ या वर्षातील एकूण खर्च ३६५४.४८ कोटी नमूद केले. २०२४-२५ या वर्षातील हाती घ्यावयाच्या विकास कामाचे नियोजन करताना त्या कामाची तात्काळ उपयोगीता व गरज आहे त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून विशेष महत्वाचे व तात्काळ हाती घ्यावयाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्प सादर करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपाचा अर्थसंकल्प हा वास्तविकतेवर आधारित असून यातील निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
अर्थसंकल्पामध्ये शहर स्वच्छता, शिक्षण विभागाचे बळकटीकरण, क्रीडा क्षेत्राचा विकास, आरोग्य यंत्रणेला उभारी, शहर सुरक्षेसाठी अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाचे अपडेशन, मोकाट श्वानांच्या नसबंदीला प्राधान्य, नवीन सुलभ शौचालयांची निर्मिती, जलवाहिन्यांच्या जाळ्यांचा विस्तार अशा विविध बाबींकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचा विकास आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने ‘मिशन नवचेतना’ या नव्या अभियानाची सुरूवात करण्यात येत आहे. १०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये इलेक्ट्रिफिकेशन, बाला कन्सेप्ट वर्गखोल्या, डिजिटल वर्गखोल्या आदी सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय मनपाचा महत्वकांक्षी प्रकल्प सुपर ७५ मध्ये आता विज्ञान शाखेसोबतच कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा देखील सी.ए. सारख्या अभ्यासक्रमासाठी समावेश करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित इंग्रजी शाळांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या शाळांच्या नव्या इमारतींची निर्मिती केली जाणार आहे. मनपाच्या ५ शाळांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळांची निर्मिती केली जाणार आहे.
नागपूर शहरातील मैदानांचा विकास, क्रीडा संकुलांचा विकास आणि खेळाडूंसाठी खेळण्याच्या सुविधा प्रदान करण्याकरिता अर्थसंकल्पामध्ये २६.८० कोटी एवढी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. मोकाट श्वानांच्या बंदोबस्ताकरिता महत्वाचा पुढाकार घेत २०२४-२५ या वर्षात ८० हजार श्वानांच्या नसबंदी शस्त्रक्रियेचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून याकरिता ५ कोटी रुपयांची तरतूद आहे. शहरात महिला आणि पुरूषांसाठी नवीन बेघर निवारा केंद्रांची निर्मिती देखील केली जाणार आहे. शहर सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक १० किमीवर १ अग्निशमन केंद्र प्रस्तावित करण्यात आलेले असून शहरात २२ केंद्रांचा मास्टर प्लॉन तयार करण्यात आलेला आहे. शहरातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांची विशेष तरतूद देखील अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
नागपूर शहरातील नागरिकांच्या महानगरपालिकेप्रति उंचावलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यास प्रशासन सक्षम असून याकरीता नागरिकांच्या सहभागाची तथा सहकार्याची अत्यंत गरज असल्याचे मनपा आयुक्त अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाले.
अर्थसंकल्पातील ठळक बाबी व आर्थिक तरतूद
– मालमत्ता करामध्ये वाढ नाही, ८४०६ नवीन मालमत्ता कर निर्धारित कक्षेत आणून मालमत्ता कर रक्कमेत वाढ
– रस्ते सुधारणा व निर्माण करण्याकरिता १००.८१ कोटींची तरतूद
– अमृत १.० अंतर्गत देशातील पहिले डबलडेकर जलकुंभाची निर्मिती होणार
– अमृत २.० अंतर्गत मनपाच्या अधिकृत व अनधिकृत लेआउट तसेच स्लम क्षेत्रात वितरण व्यवस्था, फिडर मेन टाकणे, बुस्टर पंम्प बसविण्याचे कार्य करण्यात येणार
– २०२४-२५ या वर्षात शहर टँकरमुक्त करण्याचे लक्ष्य
– भांडेवाडी येथे घनकच-यावर प्रक्रिया करून त्याची वैज्ञानिकरित्या विल्हेवाट लावण्याकरिता एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी होणार
– मृत जनावरांच्या विल्हेवाटीकरिता ‘इन्सिनेरेटर’ प्रकल्प उभारणार, प्रकल्पासाठी ९ कोटींची तरतूद
– मनपाच्या मालमत्तापैकी मनपा अभिन्यासातील काही अभिन्यास सन १९१० पासून भाडेपट्टयावर दिलेले असुन सदर अभिन्यासातील अभिलेख जिर्ण अवस्थेत झाला असुन त्यांचे अभिलेखाचे स्कॅनिंग करणे.
– नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्तांचा डाटा बँक तयार करणे.
– मालमत्तांचा जिओ मॅपिंग, जिओ टॅगिंग, जिओ फेन्सिंग इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानद्वारे कामे करणे
– मनपाच्या जागेबाबत संपूर्ण अभिलेख संगणीकृत करून अद्यावत करणे.
– भाडेपट्टयावर दिलेल्या भाडेपट्टा धारकांना सुलभ सुविधा व सेवा पुरविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने विविध कार्य प्रणाली तयार करणे
– दुर्बल घटक/झोपडपट्टीमध्ये राहणा-या मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांकरिता ५०.७३ कोटीची तरतूद
– अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ७ नवीन आकांक्षी सार्वजनिक शौचालयांची निर्मिती होणार, याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून ५.९९ कोटीची तरतूद
– वाठोडा व भांडेवाडी परिक्षेत्रात निर्माण होणा-या नंदग्राम प्रकल्पासाठी १०४ कोटी प्राप्त
– गोरेवाडा, लकडगंज कच्छी विसा मैदान आणि पोलिस लाईन टाकळी तलाव परिसरात मूर्ती विसर्जन कुंड तयार करण्यासाठी ३०.२७ कोटीची तरतूद
– जिजाउ स्मृती शोध संस्थान प्रकल्पासाठी ३६.३९ कोटीचे सुधारित प्राकलन
– बाळासाहेब ठाकरे प्राथमिक शिक्षण, कला आणि सांस्कृतिक केंद्र महाल येथे साकारणार, यासाठी २६.०२ कोटी प्राप्त
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बटरफ्लाय उद्यान, बरबटे उद्यान लकडगंज येथे कॅकटस उद्यान व डॉ. श्रीकांत जिचकार ट्राफिक पार्क उद्यानाचे नूतनीकरण
– १५ ठिकाणच्या सिमेंट रस्त्यांवरील दुभाजकांवर सौंदर्यीकरण, रस्त्याच्या दुतर्फा सौंदर्यीकरण, १८ मुख्य रस्त्यावरील नाल्यालगत व्हर्टिकल गार्डनची निर्मिती
– विद्युत विभागातर्फे शहर सौंदर्यीकरणासाठी १५ कोटीचे विविध प्रकल्प कार्यान्वित होणार
– कोरोनाकाळात मृत्यूमुखी पडलेल्यांना मनपा स्वनिधीतून प्रत्येकी १० लाखांची मदत, यासाठी ५.२० कोटीची तरतूद
– औषधी भांडरच्या नवीन इमारतीचे बांधकाम व मिनीमाता नगर हॉस्पीटलचे बांधकामाकरिता ५ कोटीची तरतूद
– दिव्यांग कल्याण योजनांसाठी ८ कोटीची भरीव तरतूद
– बाजीराव साखरे ई-ग्रंथालय परिसरात किड्स लायब्ररी व मोमिनपुरा मुस्लीम लायब्ररीच्या जागेवर अत्याधुनिक ई-लायब्ररी कतिरता १०.७५ कोटी प्रस्तावित