Published On : Mon, Aug 24th, 2020

कोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयात ५७५ खाटा उपलब्ध

– प्रशासनाने दिली सर्व पक्षीय बैठकीमध्ये महापौरांना माहिती


नागपूर : नागपूरमध्ये कोव्हिडचा प्रादुर्भाव दररोज वाढत चालला आहे. तसेच मृत्यू संख्या ५०० च्या घरात पोहचली आहे. कोव्हिड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कोविड केयर सेंटरमध्ये पण रुग्णांना पाठविले जात नाही. मनपा प्रशासनाचा दावा आहे की, कोरोना रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे नागपूर मध्ये कोविड-१९ च्या रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये केलेली खाटांची व्यवस्था, कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपलब्ध खाटांची संख्या, हॉटेल्स आणि मनपाच्या रुग्णालयात खाटांची व्यवस्था याची पाहणी करण्यासाठी महापौर श्री. संदीप जोशी यांनी वेगवेगळया समिती घोषित केल्या आहेत. ह्या सर्व समिती उपरोक्त व्यवस्थेची पाहणी करुन आपला अहवाल मंगळवारी २५ ऑगस्टला दुपारी ४ वाजता आयोजीत बैठकीत सादर करतील.

नागपूर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये ज्येष्ठ नगरसेवक श्री. दयाशंकर तिवारी यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर महापौर श्री.संदीप जोशी यांनी कोव्हीड – १९ बददल समन्वय करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती गठित केली आहे. समितीची बैठक सोमवारी (२४ ऑगस्ट) ला मनपाच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभाकक्षात आयोजित करण्यात आली होती.

Gold Rate
Wednesday 05 Feb. 2025
Gold 24 KT 84,400 /-
Gold 22 KT 78,500 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैठकीच्या सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ.योगेन्द्र सवाई यांनी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २४ खासगी रुग्णालयांमध्ये १८७६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सद्य:स्थितीत खासगी रुग्णालयात ५७५ बेडस उपलब्ध आहेत. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये १२०० खाटांची व्यवस्था आहे. जीएमसी मध्ये ६०० बेडस आहे त्यात ३४० रुग्ण भरती आहे, आयजीएमसी मध्ये ६०० बेडस आहे त्यात २९५ रुग्ण भरती आहे, दोन्ही हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन ची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच त्यांनी मनपा व्दारा संचालित कोव्हिड टेस्टींग सेंटरची सुद्धा माहिती दिली.

कोव्हिड केअर सेंटरचे बाबतीत अतिरिक्त आयुक्त श्री.राम जोशी यांनी सांगितले की, आमदार निवास, पोलिस क्वॉर्टर पाचपावली, व्हीएनआयटी होस्टेल, सिम्बॉयसीस होस्टल आणि वनामतीमध्ये २८०० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ४७३० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी तयार करण्यात आली आहे. तसेच ३३५६ खाटांची व्यवस्था प्रस्तावित आहे. हॉटेल्समध्ये सुद्धा कोविड केअर सेंटरची परवानगी देण्यात आली आहे.

महापौर श्री.संदीप जोशी यांनी सांगितले की, प्रशासनाचे दावे आणि वर्तमान परिस्थीतीमध्ये मोठी तफावत दिसत आहे. याबददल सत्य परिस्थिती जाणण्यासाठी ही समिती गठीत करण्यात येत आहे. समिती सत्य परिस्थितीची पाहणी करुन आपला रिपोर्ट देतील. खासगी रुग्णालयासाठी उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे यांच्या नेतृत्वात आरोग्य समिती सभापती श्री.वीरेन्द्र कुकरेजा, नगरसेवक श्री.संदीप सहारे, श्री.संजय बंगाले, श्री.दुनेश्वर पेठे व अति.आयुक्त श्री.संजय निपाणे यांच्या समितीची घोषणा केली. शासकीय रुग्णालयांसाठी श्री.दयाशंकर तिवारी यांचा नेतृत्वात श्री.सुनील अग्रवाल, श्री.प्रफुल गुडधे, श्रीमती वैशाली नारनवरे व डॉ.भावना सोनकुसळे तसेच कोव्हिड टेस्ट सेंटरसाठी श्रीमती वर्षा ठाकरे यांचा नेतृत्वात श्रीमती दिव्या धुरडे आणि संचालक, घनकचरा व्यवस्थापन व उपायुक्त डॉ.प्रदीप दासरवार तसेच कोव्हिड केअर सेंटरसाठी व हॉटेल याची पाहणी करण्यासीठी स्थायी समिती सभापती श्री.विजय झलके यांच्या नेतृत्वात सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, विरोधी पक्ष नेता श्री.तानाजी वनवे, श्री.किशोर कुमेरिया, संजय महाकाळकर, विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती श्री.धर्मपाल मेश्राम व उपायुक्त श्री.निर्भय जैन यांची समितीची घोषणा केली असून ही समिती संबंधित संस्था/केंद्राची पाहणी करतील.

महापौरांनी सांगितले की, नागरिकांना दिलासा देण्यासाठी एन.जी.ओ.ची मदत कशी घेता येईल याबाबत प्रशासनाने आपले मत दयावे. कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे आणि या रुग्णांना वाचविण्यासाठी सगळयांनी समोर येण्याची गरज आहे. त्यांनी टेस्टींगची संख्या वाढविणे आणि आशा वर्कर्सना रु. १००० चा अतिरिक्त मानधन देण्याचे निर्देश दिले.

बैठकीत आमदार व माजी महापौर श्री.प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती श्री.विजय (पिंटु) झलके, सत्तापक्ष नेता श्री.संदीप जाधव, विरोधी पक्ष नेता श्री. तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक श्री.दयाशंकर तिवारी, आरोग्य समिती सभापती श्री.वीरेन्द्र कुकरेजा, विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती श्री. धर्मपाल मेश्राम, नगरसेवक सर्वश्री प्रफुल गुडधे, किशोर कुमेरिया, संदीप सहारे, संजय महाकाळकर, सुनील अग्रवाल, संजय बंगाले, दुनेश्वर पेठे, अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेन्द्र सवाई उपस्थित होते.

Advertisement