नागपूर: शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देतांना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण व रोजगार व आरोग्य आदी मुलभूत सुविधा निर्माण करुन नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहूण स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.
महाराष्ट्र राज्याच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त कस्तुरचंद पार्क येथे मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार डॉ.मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, स्वातंत्र्य सैनिक, न्यायाधिश, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परेडचे निरक्षण केले. यावेळी पोलीस दलांतर्फे परेड कमांडर परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक विशाल ढोने यांनी मानवंदना दिली.
कृषी क्षेत्राबाबत पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, पायाभूत सुविधांसोबत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा देण्यासाठी राज्यात महत्त्वकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून देशातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना अत्यंत पारदर्शकतेने आणि गतिमानतेने राबविली आहे. या योजनेचा लाभ नागपूर जिल्हयातील 47 हजार शेतकऱ्यांना झाला असून 350 कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. या योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतीपंपाला विद्युत जोडणीसाठी उच्चदाब वितरण वाहिनी उभारण्यासह स्वतंत्र फीडर, सौर कृषीपंप आणि सौर रोहित्र योजना राबविण्यात येत आहे. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळयांसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सिंचन क्षेत्रातील प्रगतीबाबत पालकमंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून नागपूर जिल्हयात 220 गावात 3 हजारपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली असून यावर्षी 170 गावात मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात झाली आहे. विभागातील माजी मालगुजारी तलावांचे पुनर्जिवन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत 214 मालगुजारी तलावांचे पुनर्जिवन करुन शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ देण्यात येत आहे. बळीराजा जलसंजिवनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील 104 सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात धडक मोहिम आखून पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पेंच नदीवर मध्यप्रदेशात चौराई धरणाच्या बांधकामामुळे महाराष्ट्रच्या वाटयाला येणाऱ्या पाण्याचे नुकसान भरुन काढण्यासाठी उपाययोजना प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
नागपूर शहर स्मार्ट करण्यासंदर्भात पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नागपूर शहराची निवड झाली असून 1002 कोटीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी केंद्र शासनाकडून 190 कोटी, राज्य शासनाकडून 143 कोटी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेकडून 50 कोटी असा 383 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन असे सहा प्रकल्पही प्रस्तावित आहेत. नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
नागपूर मेट्रोचे काम वेगाने सुरु असून नागपूर मेट्रो निर्धारित वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागपूर शहर देशात उत्कृष्ट असून कचऱ्यापासून वीज निर्मितीवर भर देण्यात येत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी वीज निर्मिती केंद्रांना देण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आल्यामुळे नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यासह विविध कामांना सुरुवात झाली आहे. नागपूर शहराची जगातील सर्वात सुंदर शहर म्हणून गणना होत आहे. सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शहराप्रमाणे ग्रामीण भागातही राबविण्यात येत आहे.
उद्योग क्षेत्राबाबत पालकमंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, मिहान प्रकल्पाला गती देण्यात येत असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील नामांकित संस्थांनी आपले उद्योग सुरु केले आहे. त्यामुळे नागपूर शहर व विदर्भातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासोबत एरोस्पेस पार्कच्या माध्यमातून नागपूर जगाच्या नकाशावर येणार आहे.
आरोग्य क्षेत्राबाबत पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, नागपूर शहरातील नागरीकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील 29 दवाखान्याची सुधारणा करण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने नागपूर मध्यभारतातील महत्त्वाचे केंद्र असून एम्स, कॅन्सर इन्स्टीटयुट सुपर स्पेशिलिटी, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय याद्वारे चांगल्या दर्जेदार सुविधांसाठी निधी देण्यात येत आहे.
नागपूर शहर एज्युकेशन हब म्हणून ओळखले जात असून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत डिजीटल व प्रगत शाळांची यशस्वी अंमलबजावणी जिल्हयात सुरु आहे.
नागपूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून वार्षिक योजना 651 कोटी रुपयाची झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली असून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात येत असून याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहे. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत विविध योजना एकत्र करुन ही योजना राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर बृहद आराखडयाची अंमलबजावणी करण्यात येत असून टंचाई असलेल्या गावांना ग्रामसभेच्या सूचनेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन लोकसहभागावर आधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्याला सहज आणि सुलभ कर्जपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करण्यात येत असून मागील वर्षी 1 हजार 137 कोटी रुपयाचे कर्जवाटप करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये नागपूर विभाग सर्वात प्रथम असून वृक्ष लागवड या महत्त्वकांक्षी कार्यक्रमा अंतर्गत मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. मनरेगाअंतर्गत पूर्ण झालेल्या 4 हजार 584 विहिरींना विजेचे कनेक्शन देण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदु मानून विकेंद्रीत, पारदर्शी आणि गतिमान प्रशासन अंतर्गत आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून 40 विभागाच्या 465 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलीस दलाचे आधुनिकीकरण करुन सक्षमीकरण करण्यात येत आहे. पर्यटन विकासाअंतर्गत कोराडी देवी मंदीर परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेअंतर्गत शहिद जवानांच्या वीर पत्नीस राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आजीवन मोफत प्रवास सवलत योजनेचे स्मार्ट कार्ड श्रीमती अनुराधा एस.देव, श्रीमती प्रीतम हरबंस कौर, श्रीमती स्मिता शशीकांत जुनघरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार सुनिल सिताराम मोवाडे भिवापुर तहसिल यांना रोख 5 हजार व प्रशस्तीपत्र देण्यात आले, भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाच्यावतीने मिठी मनोज राठी, गार्गी राहूल कुलकर्णी, निधी विजय भोयर, श्रावणी लक्ष्मीकांत पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णबाण पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.