नागपूर/मुंबई: महाराष्ट्र सरकारने मंगळवारी एक नवीन आर्थिक योजना आणली ज्याअंतर्गत राज्यातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये दिले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंजुरी मिळाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः यासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला. ही रक्कम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्राकडून शेतकऱ्यांना दरवर्षी हप्त्यांमध्ये देण्यात येणाऱ्या ६,००० रुपयांव्यतिरिक्त आहे. राज्य सरकारच्या या योजनेचा फायदा एक कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चमध्ये विधानसभेत सादर केलेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पैसे जमा केले जातील. मंत्रिमंडळाने आणखी एक प्रस्ताव मंजूर केला आहे ज्यामध्ये शेतकरी केवळ एक रुपया प्रीमियम भरून पीक विम्याचा लाभ घेऊ शकतात तर उर्वरित रक्कम सरकार भरणार आहे.