नागपूर : कळमेश्वर शहराने बराच काळपर्यंत दूषित पाण्याचा सामना केला आहे. पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणून जनतेने आंदोलने, आक्रोश केलेला मी पाहिला आहे. आता कोच्छी धरणातून कळमेश्वरसाठी 60 कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व लघुउद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सावनेर तालुक्यातील व कळमेश्वर तालुक्यात 820 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष स्मृती इखार, भाजप नेते विकास तोतडे, रमेश मानकर, सोनबा मुसळे, अशोक धोटे, डॉ. प्रकाश टेकाडे, संजय टेकाडे, दिलीप धोटे, दिलीप जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले- पाच वर्षात जेवढी आश्वासने दिली होती, त्या सर्व योजनांची कामे सुरु झाली आहे. सावनेर धापेवाडा, कळमेश्वर गोंडखैरी हा 723 कोटींचा चारपदरी रस्ता होणार आहे. या रस्त्यामुळे या भागाचा विकास होईल. धापेवाडा, आदासा ही दोन तीर्थक्षेत्रांवर पर्यटकांची संख्या वाढेल. या दोन्ही क्षेत्राचा विकास करणे आपली जबाबदारी आहे. आदासाच्या वृध्दाश्रमालाही आपण मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
वर्धा रामटेक, वर्धा गोंदिया, वर्धा नरखेड आणि वर्धा सावनेर ही ब्रॉडगेज मेट्रो लवकरच आपण सुरु करणार आहोत. मेट्रोसाठी लागणार्या साहित्याचा कारखाना आपण सिंदी येथे सुरु करीत आहोत. मिहानमध्ये टाटाने आपल्या एअरक्राफ्टचे काम सुरु केले आहे. फाल्कन या कंपनीने विमाने बनविण्याचे काम सुरु केले आहे. विकास हा झपाट्याने होत आहे.
यासोबतच तरुणांना रोजगारही उपलब्ध होत आहे. महाराष्ट्रात 5 लाख व देशात 15 लाख कोटींची कामे आपण मंजूर केली आहे. आम्ही जाती पातीचे राजकारण करीत नाही, तर विकासाचे राजकारण करतो. तरुणांना रोजगार मिळाला तरच सामाजिक, आर्थिक विकास होणार आहे, असेही ते म्हणाले.