नागपूर : हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपराजधानीत दाखल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातून बंदोबस्ताचे नियोजन सुरू असून पोलीस वाहनांचा मोठा ताफा शहरात संरक्षण व नियंत्रणासाठी सज्ज झाला आहे.
हिवाळी अधिवेशनास 7 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून सुरुवात होत आहे . त्यासाठी बाहेर जिल्ह्यातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ताफे नागपुरात दाखल झाले आहेत.सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होणार आहेत. पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्ताचे नियोजन केले असून शहरात अधिवेशनासाठी निवासस्थानापासून ते जेवणापर्यंतची तयारी केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बंदोबस्तासाठी राज्यभरातून शहरात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणे सुरू केले आहे. हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी 6 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) सात तुकड्यांचा समावेश आहे. आधुनिक सुविधा असलेली 5 सुसज्ज अशी दक्षता वाहने, एक हजार होमगार्ड४० बॉम्ब शोधक-नाशक पथकांसह विशेष कमांडो सुरक्षेसाठी सज्ज आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपुरातील विधानभवनाला सशस्त्र पोलिसांचा घेराव घातला जाईल. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 11,000 जवानांपैकी 6,000 जवानांना राज्यभरातील विविध जिल्ह्यातून पाचारण करण्यात आले आहे.
सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यासाठी, नागपूरचे नऊ पोलिस उपायुक्त (DCP) दर्जाचे अधिकारी आणि इतर जिल्ह्यांतील 10 DCP दर्जाचे अधिकारी सुरक्षा व्यवस्थेसाठी जमवले जात आहेत. याशिवाय सत्र व्यवस्थेसाठी 50 एसीपी, 75 पोलिस निरीक्षक आणि २० महिला पोलिस निरीक्षकांना नागपुरात बोलावण्यात आले आहे. बंदोबस्तात एसआरपीएफच्या 10 कंपन्या आणि 1000 होमगार्डचा समावेश आहे.