मधुकरराव लिमये कार्यक्षम खासदार पुरस्कार प्रदान
नागपूर/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकर्याचा माल सरळ निर्यात करता यावा, यासाठी आपण राज्यात 7-8 पोर्ट तयार करणार असून त्यामुळे शेतकरी उत्पादित माल आयात-निर्यात करण्यासाठी मुंबईला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. नाशिक येथेही एक पोर्ट तयार करून तेथून सर्व ठिकाणी मालाची निर्यात शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे आज ना. नितीन गडकरी यांना माधवराव लिमये कार्यक्षम खासदार पुरस्कार नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ना. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला ना. भारती पवार, खा. रक्षा खडसे, माजी खा. सुभाष भामरे, खा. हेमंत अप्पा गोडसे, गिरीश नातू, खा. विनय सहस्रबुध्दे, संजय कारंजकर, प्रणव पवार, प्रा. शंकर बोराडे, जयप्रकाश दातेगावकर आदी उपस्थित होते.
सत्कार व सन्मान होत असतात. पण नाशिकच्या वाचनालयाच्या या सत्काराची परंपरा वेगळी आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- गरीब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणार्या सर्वाधिक अभ्यासिका आज नाशिकमध्ये आहे. या सांस्कृतिक नगरीचे वैशिष्ट्य वेगळे आहे. या वाचनालयामुळे समाजात सांस्कृतिक चळवळ फोफावली. या जिल्ह्यातून कांदा, द्राक्षे निर्यात केली जातात. पण कांद्याच्या साठवणुकीची व्यवस्था नाही. त्यामुळे 22 हजार कोटींचे शेतकर्यांचे नुकसान होते. सुमारे 1 लाख कोटींचा शेतकर्यांचा माल या जिल्ह्यातून निर्यात केला जातो. शेतकर्यांनी बांबूच्या उत्पादनाकडे वळावे. कांदा साठवणुकीसाठी बांबूचे गोडावून बांधून त्यात आतील भागात रॅक तयार करून कांदा साठवता येईल. यामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान काही प्रमाणात का होईना कमी होईल, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.
काळाच्या ओघात वाचनालयानेही बदलले पाहिजे, असे सांगत ना. गडकरी म्हणाले- नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारले पाहिजे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञानही वापरले पाहिजे. लोकांकडे उद्यमशीलता आहे. या लोकांना मदत कशी करता येईल, याचा प्रयत्न व्हावा.
समाजात सांस्कृतिक चळवळ वृध्दिंगत करण्यात वाचनालयाचे योगदान मोठे आहे, असे सांगताना ना. गडकरी यांनी नासिक नगर, सोलापूर, अक्कलकोट या महामार्गाचे महत्त्व सांगितले. 1270 किमीचा हा महामार्ग 122 किमी नाशिकमधून जातो. संपूर्ण महामार्गासाठी 54 हजार कोटी रुपये खर्च होणार असून 980 हेक्टर जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. यामुळे उत्तरेकडून मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक या मार्गाने दक्षिण भारतात जाईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.