‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होणार नोंद
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने नागपुरात ७५ स्विमर्सने रिले पद्धतीने सलग सहा तास जलतरण केले. आशा पद्धतीचा उपक्रम नागपूर शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आला असून या उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये केली जाणार आहे. शनिवारी (ता. १३) नागपूर सुधार प्रान्यास, हनुमान स्पोर्ट्स अकॅडमी व जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने अंबाझरी रोडवरील एनआयटी स्विमिंगपुल येथे ‘स्विमॅथॉन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिव्यांग, बाल व महिला जलतरणपटू असलेल्या स्विमर्सच्या गटाला हिरवी झेंडी दाखवली. याप्रसंगी नागपूर सुधार प्रान्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार, सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, हनुमान स्पोर्ट्स अकॅडमीचे डॉ. उगेमुगे, पर्यटन संचालनालयाचे उप संचालक प्रशांत सवाई, क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे एडज्युकेटर निखिलेश सावरकर, कामांडींग ऑफिसर ले. कमांडर दीप करण सिंग, जेडी स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दुबळे, आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण पटू जयंत दुबळे, श्रीमती प्रीती लांजेकर व अश्विन जनबंधु आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी स्विमर्सला शुभेच्छा दिल्या. तसेच नागपूर शहरात उत्तम खेळाडू तयार व्हावेत यासाठी सर्व सोयीसुविधा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. सोबतच आयोजकांचे सुद्धा अभिनंदन केले.
‘स्विमॅथॉन’ मध्ये ७५ स्विमर्सनी सकाळी ११.४५ पोहायला सुरुवात केली असून सायंकाळी ६.५४ वाजता सांगता केली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी हा प्रयत्न करण्यात आलेला असून एकूण ६ तास ९ मिनिटे एवढा करण्यात आला. यात ८ वर्षांपासून तर ७५ वर्षांपर्यंतचे लहान मुले, तरुण, पुरुष, महिला, आणि दिव्यांग स्विमर्स सहभागी झालेले होते. उपक्रमात ७५ स्विमर्सचे विविध गटात विभाजन करून रिले पद्धतीने सहा तासापेक्षा अधिक वेळ पूर्ण करण्यात आला. उपक्रमाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण पटू जयंत दुबळे यांनी केले. स्विमॅथॉनच्या निरीक्षणासाठी संपूर्ण वेळ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे एडज्युकेटर निखिलेश सावरकर उपस्थित होते.
‘बुडणाऱ्याला आपण वाचवू शकतो’ तसेच घरातील प्रत्येकाला पोहता येणे आवश्यक आहे. त्याकरिता स्विम फॉर ऑल असा संदेश या स्विमॅथॉन मधून देण्यात आला.
जयंत दुबळे यांना ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र प्रदान
आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण पटू जयंत दुबळे यांनी श्रीलंका ते भारत यादरम्यानची ३० किमीच्या अंतराची पाल्कची खाडी ९ तास २० मिनिटांमध्ये पोहून जगातील दुसरा वेगवान जलतरणपटू ठरल्याबद्दल ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’चे एडज्युकेटर निखिलेश सावरकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पुढील महिन्यामध्ये युके मधील नॉर्थ चॅनेल पोहण्यासाठी आयर्लंड येथे जाणाऱ्या जयंत दुबळेला केंद्रीय नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या.
स्विमॅथॉनचा समारोप
स्विमॅथॉन मध्ये सहभागी सर्व स्विमर्सना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, हनुमान स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रीती लांजेकर, अश्विन जनबंधु, जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव डॉ. संभाजी भोसले, जेडी स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते प्रमानपत्रांचे वितरण करण्यात आले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, पर्यटन संचनालाय, नागपूर, डॉल्फिन स्विमिंग क्लब, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग (NIS) यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा देशपांडे यांनी केले तर अतिथींचे स्वागत प्राजक्ता दुबळे यांनी केले तर आभार ऐश्वर्या दुबळे यांनी मानले.