नागपूर : शहरात पुन्हा अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ५७ वर्षीय चौकीदाराने ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शिवाय आरोपीच्या पत्नीने पीडित मुलीला तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.यासंदर्भातही तपास सुरु आहे.
महेश गोपाळप्रसाद रहांगडाले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी माहेश्वरी महेश रहांगडाले हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज पोलीस हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये राहणारी मुलगी 11 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास खेळण्यासाठी तिची सायकल घेण्यासाठी पार्किंग एरियामध्ये गेली होती. त्याचा फायदा घेत आरोपी वॉचमन महेश याने मुलीला त्याच्या खोलीत नेले आणि तिचे शोषण केले. हा घडलेला प्रकार चौकीदाराच्या पत्नीला सांगितला असता तिने तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला.
लकडगंज पीएसआय शुक्ला यांनी मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे आरोपी महेश रहांगडाले आणि त्यांची पत्नी माहेश्वरी महेश रहांगडाले या दोघांविरुद्ध भादंवि कलम 376(1)(एन), 376(ए)(बी), 506 नुसार कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला.आरोपी चौकीदाराला अटक करण्यात आली असून POCSO कायदांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.