खा. श्रीनिवास पाटील यांनी केले ना. गडकरींच्या कामाचे कौतुक लोकसभा प्रश्नोत्तरे
नागपूर/दिल्ली: यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची 90 टक्के कामे पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान खा. श्रीनिवास पाटील यांनी ना. नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले.
खा. भावना गवळी यांनी आज सभागृहात राष्ट्रीय महामार्गांचे 90 टक्के काम पूर्ण झाल्याबद्दल ना. गडकरी यांना मनपासून धन्यवादही दिले. यावेळी ना.गडकरी यांनी सभागृहाला सांगितले की, शासनाने घोषित केलेले 115 मागास जिल्हे व सामाजिक आर्थिक मागास क्षेत्र असलेल्या भागातील राष्ट्रीय महामार्गांचे काम गतीने पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य आहे. या निकषावरच ही कामे करण्यात आली. विदर्भात 10 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यवतमाळ, अमरावती, वाशीम हे शेतकर्यांचे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कामे करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. मागास भागातील जिल्ह्यांमध्ये 1 लाख कोटींचे रस्ते शासन बनवणार आहे. मागास भागातील बहुतेक रस्त्यांची कामे आम्ही मंजूर केले आहे.
एका दिवसात 24 किमी रस्ता
या प्रश्नाच्या चर्चेत खा. श्रीनिवास पाटील यांनी ना. गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी सोलापूर विजापूर या रस्त्याचे उदाहरण सभागृहात दिले. सोलापूर विजापूर हा डांबरी रस्ता एका दिवसात 24 किमी बांधण्यात येऊन एक विक्रम स्थापित करण्यात आल्याचा उल्लेख खा. पाटील यांनी यावेळी बोलताना केला. सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाची सुरुवात नागपुरातून गडकरींनीच केली असल्याचा उल्लेख करून ना. गडकरींचे काम प्रशंसनीय असल्याचेही ते म्हणाले.