कृषी प्रदर्शन व शेतकऱ्यांसाठी परिसंवाद
कृषी जागृती सप्ताहानिमित्त मार्गदर्शन
यवतमाळ। हवामानाच्या बदलासोबतच कृषीचे तंत्रही बदलत आहे. या बदलासोबत शेतकऱ्यांनी स्वत:हात बदल करणे आवश्यक आहे.अलिकडे शेतीक्षेत्रात आलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अंगिकार करण्यासोबतच आधुनिक पध्दतीने शेती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी केले.
कृषी जागृती सप्ताहानिमित्त बचत भवन येथे कृषी प्रदर्शनी व शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्गाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. शरद कुळकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे, कृषी विकास अधिकारी जगन राठोड आदी उपस्थित होते.
सुरूवातीस मान्यवरांच्याहस्ते कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन दालनांची पाहणी करण्यात आली. अजुनही 55 टक्के नागरीक शेती करतो. त्यामुळेशेती व्यवसायाकडे कदापी दुर्लक्ष करता येत नाही. शेती क्षेत्राला ऊर्जा देण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना व अनुदानाचे कार्यक्रम राबविते.अलिकडे हवामानातील बदलामुळे शेती पिकांवर परिणाम होत आहे. या बदलानुसार शेतकऱ्यांनीही बदलने आवश्यक असून तशी पिकपध्दती व तंत्रज्ञान अंगिकारावे, असे जैन म्हणाले.
एकापेक्षा जास्त पिके घेता यावे म्हणून शेतकऱ्यांनी शाश्वत सिंचनाच्या सोईकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेततळे बांधण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. शेततळे उभे राहिल्यास एकापेक्षा जास्त पिके घेता येईल, पर्यायाने शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती सुधारण्यात मदत होणार आहे. शेततळ्यांच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्याची सुचना यावेळी जैन यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन कॅाल सेंटरची योजना राबवित आहे. तसेच हवामान आधारीत सल्ला, पाऊस पाण्याचा अंदाज याबाबतची माहिती शेतकऱ्यांना विनामुल्य दिली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून घ्यावी, असेही जैन यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परिक्षण करावे. कृषी विभागाच्या ग्रामीण पातळीवरील सहाय्यकांनी शेतकऱ्यांशी संपर्क वाढवावा. त्यांच्या अडचणी सोडविण्यास त्यांना मदत करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांनी स्वत: बियाणे तयार करावे, असे सांगितले. बियान्यांसोबतच कृषी उत्पादन कंपन्या शेतकऱ्यांच्या तयार झाल्या पाहिजे. शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी अधिक मेहनतीची तयारी ठेवावी असेही ते म्हणाले. यावेळी डॅा.कलशेट्टी यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले तर आभार आत्माचे प्रकल्प संचालक इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाचे संचलन पुनीत मातकर यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद पार पडले.
माहिती पुस्तकांचे विमोचन
कार्यक्रमाच्या प्रसंगी वेगवेगळ्या माहिती पुस्तकांचे प्रकाशनही अप्पर मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्याहस्ते झाले. त्यात आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे यांच्या कृषि-उद्योजकता विकास मार्गदर्शिका या पुस्तकाचा समावेश आहे. या पुस्तकात शेतीशी संबंधित उद्योग, व्यवसाय तसेच त्याचे आराखडे, त्यासाठीच्या योजना, गटशेती, बाजार अभ्यास आदींचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच यावेळी मृद व जलसंधारण कामांचे उपचार व तांत्रिक मापदंडाबाबतची माहिती व अन्य दोन माहिती पत्रकाचे विमोचन करण्यात आले.