बुलढाणा जिल्हा दारमुक्ती अभियानातर्फे मतदारांना आवाहन
बुलढाणा। गेल्या काही वर्षापासुन निवडणूकांमध्ये दारुचा प्रचंड वापर करण्यात येत आहे. फक्त निवडणूकीच्या काळात मतदारांना दारु पाजायची आणि मते ओढायची. मग पाच वर्षे प्रचंड भ्रष्टाचार करायचा, असा प्रयत्न अनेक उमेदवरांचा असतो. अशा भ्रष्ट उमेदवारांकडून दारु पिऊन मतदान करणे म्हणजे संविधानाने आपल्याला जो मताधिकार दिलेला आहे. त्याचा दुरुपयोग करणे आहे. दारुमुळे उदध्वस्त होणाऱ्या जिल्ह्यातील हजारो कुटूंबे वाचविण्यासाठी व जिल्हा दारु मुक्त करण्यासाठी नुकतेच एक अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला बळकटी आणण्यासाठी मतदारांनी आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये दारु पिणाऱ्या व पाजणाऱ्या उमेदवारांना अजिबात मतदान करु नये, असे आवाहन बुलडाणा जिल्हा दारमुक्ती अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.
अभियानाच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात या संदर्भातील आवाहन करण्यात आले आहे की, आॅगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हाभरात अनेक ग्रामपांचायतींची निवडणूक आहे. आपला आजवरचा अनुभव पाहता निवडणुकीच्या काळात प्रचंड दारुचा महापूर वाहत असतो. उमेदवार निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापर असतात. त्यात मतदारांना दारुही पाजली जाते. मात्र अशा प्रकारे दारु पाजुन निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा विकास करु शकत नाही. बुलडाणा जिल्हा हा मातृतीर्थ म्हणुन ओळखला जातो. राष्ट्रमाता मॉ जिजाऊंचे जन्मस्थान या जिल्ह्यात आहे. याशिवाय शेगाव ही संत गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी, लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सैलानी बाबाचा दर्गा, संत चोखामेळा यांचे जन्मस्थान हे सर्व याच जिल्ह्यात आहे. त्यामुळे साधुसंतांच्या आणि थोर महापुरुषांना खऱ्या अर्थाने अभिवादन करायचे असेल, तर जिल्हा दारमुक्त झाला पाहिजे. कारण दारुमुळे आजवर अनेक संसार उदध्वस्त झालेले आहेत. अनेक बालकांना अनाथ व्हावे लागले आहे. त्यामुळे आता जिल्हा दारुक्त करण्यासाठी हे अभियान सुरु झालेले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मतदारांनी दारु पिणाऱ्या आणि पाजणाऱ्या उमेदवाराला मतदान करु नये, असे आवाहन या पत्रकातुन करण्यात आले आहे.
या पत्रकावर अभियानाचे जिल्हा संयोजक अॅड. सतीश रोठे, किसन वाकोडे, गणेश वानखेडे, नरेंद्र लांजेवार, रणजितसिंग राजपूत, जयश्रीताई शेळके, प्रमोद दांडगे, दिपक साळवे, हरिदास खांडेभराड, जयराम नाईक, कैलास आडे, रेखा खरात, जगदेव महाराज, गोपाळराव जाधव, गजानन जाधव, काशिनाथ चव्हाण, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, रामभारती महाराज, संतोष महाराज शेळके, अॅड. विजय शेळके, सुधीर देशमुख यांनी केले आहे.
Representational pic