ना. नितीन गडकरी, न्या. भूषण गवई यांची उपस्थिती
नागपूर: नागपूरचे सुपुत्र आणि सध्या विधी क्षेत्रात देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झालेले सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपूर महानगरपालिकेच्या वतीने १८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. रवी देशपांडे यांची उपस्थिती राहील.
विशेष अतिथी म्हणून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर संदीप जोशी भूषवतील.
या भव्यदिव्य नागरी सत्कार कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन समिती आणि आयोजन समितीचे गठन करण्यात आले आहे. मार्गदर्शन समितीमध्ये सेवानिवृत्ती न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, खासदार विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. डॉ. परिणय फुके, आ. समीर मेघे, आ. आशीष जयस्वाल, आ. राजू पारवे, आ. टेकचंद सावरकर, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नासुप्रच्या सभापती शीतल उगले, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, अविनाश पांडे, भंते सुरई ससाई, माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग, ॲड. शशांक मनोहर, माजी खासदार विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, माजी खासदार अजय संचेती, डॉ. गिरीश गांधी, राजे मुधोजी भोसले, डॉ. दीपक खिरवडकर, डॉ. विश्राम जामदार, डॉ.वेदप्रकाश मिश्रा, डॉ. सिद्धार्थविनायक काणे, डॉ.विलास डांगरे, आर्च बिशप अलाईस गोंडसाल, राजेश लोया, प्रकाश जाधव, अनिल अहीरकर, प्रवीण दटके, महेश सहारे, प्रदीप पोहाणे, तानाजी वनवे, वैशाली नारनवरे, दुनेश्वर पेठे, किशोर कुमेरिया यांचा समावेश आहे. आयोजन समितीमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा समावेश असून या भव्य दिव्य आयोजनाला संस्मरणीय बनविण्याचे आवाहन उपमहापौर मनीषा कोठे आणि आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
अशी राहील पार्किंग व्यवस्था
सरन्यायधीश शरद बोबडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यासाठी येणाऱ्या मंत्री, खासदार, आमदार, न्यायमूर्ती यांसह अन्य अतिविशिष्ट व्यक्तींच्या वाहनांकरिता कविवर्य सुरेश भट सभागृहातील वाहनतळावर पार्किंगची व्यवस्था राहील. अन्य चार चाकी वाहनांकरिता रेशीमबाग मैदानावर पार्किंग व्यवस्था असेल तर दुचाकी वाहनांसाठी जामदार हायस्कूलच्या मैदानावर पार्किंग व्यवस्था असेल.