Published On : Sat, Jan 25th, 2020

आनंदराव संयमी, समर्पित आणि समजदार कार्यकर्ता : नितीन गडकरी

निश्चल प्रवृत्तीने काम करणारा कार्यकर्ता : देवेंद्र फडणवीस
आनंदराव ठवरे यांचा सत्कार

नागपूर: भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे हे संयमी, समर्पित आणि समजदार कार्यकर्ता आहे. प्रतिकूल परिस्थितीत पक्षासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांपैकी आनंदराव एक आहे. त्यांच्या कार्यापासून नवीन कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग, सडक परिवहन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Gold Rate
Saturday 25 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारतीय जनता पक्ष शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आनंदराव ठवरे यांच्या सत्काराचे आयोजन आज शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आनंदराव व सौ. सुमनताई ठवरे, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. मोहन मते, सुभाष पारधी, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी आ. डॉ. मिलिंद माने, आ. रामदास आंबटकर, महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, माजी आ. रेड्डी, अशोक मानकर, माजी आ. सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, माजी महापौर मायाताई इवनाते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले- पक्षाचा जुन्या काळाचा इतिहास गौरवशाली आहे. प्रतिकूल काळात मी महामंत्री असताना आनंदराव कार्यालय प्रतिनिधी होते. दररोज सकाळी10 ते रात्री 10 ते कार्यालयात बसून अनेकांची कामे करीत होते. या कामातून आणि आंदोलनांमधून त्यांनी विविध समाजाचे अनेक कार्यकर्ते पक्षाला जोडले. त्या काळातील संघर्ष, आंदोलने याच्या मजेदार गमती व किस्से सांगून गडकरींनी त्या काळातील चित्र सभागृहासमोर उभे केले. आनंदराव पक्षाच्या इमारतीतील एक पायव्याचा दगड आहे. त्यावर आज पक्षाची इमारत उभी आहे, असेही गडकरी म्हणाले.

निश्चल प्रवृत्तीने काम करणारा कार्यकर्ता : फडणवीस
आनंदराव ठवरे यांना आपण लहानपणापासून पक्षाचे काम करताना पाहिले आहे, असे सांगताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले- निश्चल प्रवृत्तीने काम करणारा कार्यकर्ता म्हणजे आनंदराव. कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आनंदराव होय. पक्षाचे चांगले आणि वाईट दिवस आले तरी त्यांच्यावर कोणताही विपरित परिणाम झाला नाही. पक्षाचा संघर्षाचा मोठा काळ गेला. संघर्ष समोर असल्याचे दिसत असतानाही त्यांनी पक्षाचे काम निरंतर सुरु ठेवले. आणिबाणीत त्यांना कारावासही भोगावा लागला. त्यानंतरही पक्षाचे काम पुन्हा सुरुच होते. मला काय मिळाले, काय नाही मिळाले याचा कोणताही विचार त्यांच्या मनास शिवला नाही. किंबहुना तसा तराजू त्यांनी कधी लावलाच नाही. समर्पित भावनाने काम करण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांनी आनंदरावांकडून घ्यावी असेही फडणवीस म्हणाले.

अभिमान वाटावा असे व्यक्तिमत्त्व : बावनकुळे
आनंदराव ठवरे या कार्यकर्त्याचा अभिमान वाटावा असे हे व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. सर्वांशी त्यांचे पारिवारिक संबंध होते. हजारो कार्यकर्त्यांशी कार्यकर्ता म्हणून त्यांनी संबंध ठेवले होत. त्यांनी जोपासलेल्या कार्यकर्त्याचा हा सत्कार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यातही आनंदराव मागे नव्हते. कामगारांचे, विणकरांचे, झोपडपट्टीवासियांच्या आंदोलनाचे त्यांनी त्या काळात नेतृत्व केले. उत्तर नागपुरात अनेक गरीबांना घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. एक निष्कलंक कार्यकर्ता म्हणून आज त्यांचा मी गौरव करीत असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

यावेळी आनंदरावांचा सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ह्स्ते करण्यात आला. तसेच सुमनताई ठवरे यांचा सत्कार मायाताई इवनाते यांच्या हस्ते करण्यात आला. आनंदरावांनी आज 81 व्या वर्षात पदार्पण केले. आनंदरावांच्या सन्मानपत्राचे वाचन किशोर पालांदूरकर यांनी केले. कार्यक्रमाचे खुमासदार संचालन जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केले.

Advertisement