२ फेब्रुवारी २०२० ला सकाळी १० वाजता घडलेली मध्य भारतातील ही पहिलीच विदारक घटना म्हणता येईल. श्रीमती दीक्षा बोंडे, वय ४७ वर्षे, या चिखला (मॉईल) येथील रहिवासी असून त्या मुलीच्या लग्नाकरिता घराची साफ-सफाई करीत होत्या. घरातील जुने कपडे व कचरा जाळण्यासाठी त्यांनी अंगणात आणला. त्यात जुने ट्यूबलाईट्स पण होते. कपडे जाळण्यासाठी आग लावताच तिथे मोठा स्फोट झाला.
स्फोट इतका भयानक होता की, बॉम्ब फुटल्यासारखा आवाज झाला. ट्यूबलाईट्सचा स्फोट झाल्यामुळे काचेचे बारीक तुकडे श्रीमती दीक्षा बोंडे यांच्या शरीरात खोलवर घुसले. तीव्र वेदनेमुळे व अंगाची आग होत असल्यामुळे त्या जोरजोरात ओरडायला लागल्या. नातेवाईकांनी त्यांना लगेच लता मंगेशकर हॉस्पीटल, सीताबर्डी, नागपूर येथे दुपारी २ वाजता उपचारासाठी आणले.
वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र चोपडे यांनी रुग्णाला ताबडतोब कॅज्युअल्टीमध्ये बघितले असता रुग्णाची अवस्था खूपच खालावलेली दिसली. त्यांना श्वास घेता येत नव्हता. ब्लडप्रेशर कमी होऊन त्या बेशुध्द झाल्या होत्या. डॉ. चोपडे यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला आयसीयूमध्ये नेले व उपचार सुरु केले. उपचारादरम्यान त्या वारंवार बेशुद्धावस्थेत जात होत्या. अथक प्रयत्नानंतर रुग्णाला शुद्ध आली.
त्यानंतर शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या शरीरातून १६८ जागी असलेले काचेचे तुकडे डॉक्टरांनी यशस्वीरीत्या बाहेर काढले. अशाप्रकारे लता मंगेशकर हॉस्पीटलमधील सर्जरी विभागातील वैद्यकीय चमूने अथक प्रयत्न करून रुग्णाचा जीव वाचविला. शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र चोपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्ष देशमुख, डॉ. अफजल शेख, नेत्ररोग तज्ञ डॉ. सोनाली खन्ना, बधिरीकरण तज्ञ डॉ. प्राजक्ता बिजवे यांनी ही कामगिरी पार पाडली.